शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:22 AM2021-03-25T01:22:28+5:302021-03-25T01:22:40+5:30

दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता

Determined to stand behind the farmers' movement | शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याचा केला संकल्प

शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याचा केला संकल्प

Next

ठाणे : महात्मा गांधींनी १९३० साली केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला स्मरून आम्ही मिट्टी सत्याग्रह करीत आहोत. आमची माती, जमीन, संविधान आणि लोकशाही जपण्यासाठी शेतकरी आंदोलनाला समर्थन देऊन अहिंसात्मक मार्गाने लढण्याचा संकल्प समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांच्या रंगमंचावर कलाकार, कार्यकर्त्यांनी मतकरी स्मृतिमालेच्या कार्यक्रमात केला. 

दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता ‘मिट्टी सत्याग्रह’. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मोरे हिने केले. प्रास्ताविकात मीनल उत्तुरकर यांनी शेतकरी आंदोलनाची भूमिका विशद केली. कोरोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करत पार पाडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी एकेक मूठभर माती एका कलशात जमा केली आणि मी मिट्टी सत्याग्रही अशा बॅनरवर स्वाक्ष-या केल्या. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी सर्वांना मातीचा टिळा लावला.
यावेळी किसननगरच्या मुलामुलींनी अत्यंत अनोखी नृत्य नाटिका सादर करून या विषयाचा महत्त्व प्रभावीपणे मांडले. तर अनुजा लोहार, दुर्गा माळी, प्राची डांगे, अंजली लोहार, मंगम्मा धनगर यांनी यह धरती अपनी है, अपना अंबर है रे.. या गाण्यावर नृत्य सादर केले. सुशांत जगताप, निशांत पांडे, ओंकार गरड यांनी शेतकरी आंदोलनावर त्यांचे विचार मांडले. प्राची डांगे हिने माणसे या अनिल अवचट यांच्या पुस्तकातील दुष्काळाने गरीब शेतकरी यांच्या झालेल्या भयंकर परवडीच्या वर्णनाचे अभिवाचन केले.

मिट्टी सत्याग्रह ठाण्याच्या वस्ती-वस्तींत नेणार
मिट्टी सत्याग्रहाचा हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सर्वांना केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करून मिट्टी सत्याग्रहाचा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. 

या वेळी संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शेतकरी कायद्यांबरोबरच सरकार जे कामगार विषयक कायदे आणत आहे ते मालकांच्या बाजूचे असून त्यामध्ये अशा नवीन तरतुदी आहेत की कामगार आपल्या अधिकारांसाठी लढू शकणार नाहीत. असुरक्षित कामगारांची संख्या आताच ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे ती अजून वाढेल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले, ओमकार जंगम, प्रवीण खैरालिया आदींनी मेहनत घेतली.

Web Title: Determined to stand behind the farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.