महाराष्ट्राच्या प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा निर्धार करा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

By सुरेश लोखंडे | Published: May 1, 2023 12:31 PM2023-05-01T12:31:41+5:302023-05-01T12:32:27+5:30

महाराष्ट्र दिन वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Determined to reach new heights of Maharashtra's progress, asserted the Thane Collector | महाराष्ट्राच्या प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा निर्धार करा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

महाराष्ट्राच्या प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा निर्धार करा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

googlenewsNext

सुरेश लोखंडे/ठाणे 

ठाणे : महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पार पडला. कृषि, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने आपला नावलौकिक मिळविला आहे. राज्याचा हा वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा निर्धार  सर्वांनी करावा. राज्याच्या विकासात ठाणे जिल्ह्याचे मोठे योगदान असल्याचे सुतोवाच ही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.       

महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मान्यवर, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शिनगारे यांनी शुभेच्छा दिल्या. राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राहिलेले राज्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी ता प्रसंगी स्पष्ट केले. कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी  उपस्थित होते.           

ठाणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. तसेच रस्ते, उड्डाणपूल आदींची कामेही सुरू आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी ९०० बेडचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर आजपासून जिल्ह्यात नऊ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत आहेत, असेही शिनगारे यांनी सांगितले. नागरिकांना आपले घर बांधण्यासाठी माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आजपासून अंमलात आणले आहे. जिल्ह्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.       

यावेळी राज्य शासनाच्या विविध रिक्त पदांसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील दहा उमेदवारांना यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्तीची शिफारसपत्रे देण्यात आले. यामध्ये राज्य कर निरीक्षक व राज्य सुरक्षा रक्षक मंडळातील उमेदवारांचा समावेश होता. या कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर पहिल्यांदाच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही पोलीस दलाच्या बँड पथकाने वाजविले. यावेळी झालेल्या संचालनालनात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड, पोलीस आयुक्तालय, जिल्हा ग्रामीण पोलीस, पोलीस बँड पथक, अग्निशामक दल, ठाणे महापालिका सुरक्षा रक्षक दल, रुग्णवाहिका आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Determined to reach new heights of Maharashtra's progress, asserted the Thane Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.