देवमासा अखेर गेला देवाघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2015 01:38 AM2015-06-26T01:38:40+5:302015-06-26T01:38:40+5:30
अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याजवळ जखमी अवस्थेत वाहत आलेला ४२ फुटी महाकाय देवमासा अखेर गुरुवारी मृत्युमुखी पडला
अलिबाग : अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याजवळ जखमी अवस्थेत वाहत आलेला ४२ फुटी महाकाय देवमासा अखेर गुरुवारी मृत्युमुखी पडला. रेवदंडा येथील समुद्र परिसरात त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्रीपासून देवमाशाला वाचविण्यासाठी प्रशासनाच्या सर्वच विभागांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर देवमासा देवाघरी गेला.
अलिबागपासून श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत असे महाकाय मासे सतत आढळतात. बुधवारी दुपारी रेवदंडा पूल आणि आगरकोट किल्ला यांच्यामध्ये असणाऱ्या समुद्रकिनारी सुमारे ४२ फुटांचा महाकाय मासा आल्याची वार्ता रेवदंडा गावात पसरली. त्यावेळी अलिबाग वन खात्यातील कर्मचाऱ्यांनी माशाला समुद्रात ढकलण्याचे प्रयत्न केले. मात्र मासा मोठा असल्याने त्यांना यश आले नाही.
त्यानंतर तातडीने याची माहिती अलिबाग येथील कस्टम आॅफिसचे निरीक्षक मनोज आढाव यांना पत्रकारांनी दिली. त्यांनी तत्परतेने मुरुड येथील कोस्ट गार्ड कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी जे. पी. यादव यांच्याशी संपर्क साधला. यादव यांनी तातडीने बचाव कार्यासाठी टीम तयार केली. हावरक्राफ्ट बेलापूर येथे असल्याने घटनास्थळी पोचले नाही. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अलिबागचे प्रांत दीपक क्षीरसागर, तहसीलदार व इतर कर्मचारी, तसेच कोस्ट गार्ड, मत्स्य व्यवसाय विभाग, वन विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पोलीस विभाग, मेरीटाइम बोर्ड आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्रे न, मोठे दोरखंड, मोठे जहाज आदींचा वापर करून या देवमाशाला खोल समुद्रात नेऊन सोडण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. यासाठी उरणच्या नागरी सुरक्षा दलाने विशेष मदत केली. परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी गुरुवारी सकाळी हा मासा मृत्युमुखी पडला
जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्णय घेऊन रेवदंडा बीच परिसरात मोठा खड्डा तयार करून पशुवैद्यकीय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रासायनिक पदार्थांचा वापर करून माशावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)