रुंदे गावात साकारतेय देवराई, ५० एकर जागा, २५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:35 AM2017-09-22T03:35:22+5:302017-09-22T03:35:24+5:30
कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
‘देवराई’च्या प्रकल्प अधिकारी संगीता जोशी म्हणाल्या की, ‘रुंदे गावात पर्यावरण दक्षता मंच आणि वन विभागाने जूनमध्ये वृक्षरोपणास सुरुवात केली. या प्रकल्पाला एनव्हायरो संस्था निधी देणार आहे. तर प्रकल्पासाठी ५० एकर जागा वन विभागाने दिली आहे.
त्यापैकी १० एकर जागेवर पावसाळ््यात सात हजार झाडे लावली आहेत. त्यात आवळा, आंबा, आपटा, हिरडा, कांचन, खैर, वड, पिंपळ, काटेसावर अशी १०० जातीची झाडे आहेत. या प्रकल्पातून वनीकरण वाढविण्याचा उद्देश आहे. रुंदेनजीकची काळू नदी आटते. तसेच या परिसरात जमिनीची धूप थांबवणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. वन्यजीव साखळी वनीकरण वाढल्यावर वाढीस लागेल.’
पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले म्हणाल्या की, ‘देवराई प्रकल्पासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, रोटरी क्लब यांचे सहकार्य घेतले आहे.
जमिनीची पोत तसेच येथे कोणती झाडे रुजतील, याची माहिती वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांकडून घेतली. रोपांकरता विकसित केलेल्या नर्सरीत जवळपास १२ हजार रोपे लावली. त्यापैकी सात हजार रोपांची लागवड केली आहे. सात वर्षांत ५० एकर जागेवर २५ हजार झाडे वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे येथे देवराई बहरणार आहे.’
वन्यजीवही वाढणार
पर्यावरण दक्षता मंचाने प्रथमच वनीकरणाच्या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. जानेवारीपासून पावसाळ््यापूर्वी जमिनीतील तण काढणे, खड्डे खोदणे याचे काम केले. पाऊस चांगल्याप्रकारे सुरू झाल्यावर झाडे लावली. खत व पाणी देण्याचे काम कर्मचारी व स्वयंसेवक करणार आहेत.
प्रकल्प राबवण्यापूर्वी केलेल्या पाहणीत रुंदे येथे मंचाला मोराचे वास्तव्य, सापाची कात, कासवाची अंडी आढळली. भारतातील अनेक वन्यजीव व वनस्पतीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीव वाढीस लागून जंगल वाढावे, हाच देवराई प्रकल्पामागील हेतू आहे, असे शाईवाले म्हणाल्या.