विकासकाला ७३ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:48 AM2019-07-02T00:48:28+5:302019-07-02T00:48:47+5:30
नौपाड्यातील महाजन सोसायटी या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम मिळवून देतो, अशी बतावणी दलालीचे काम करणाºया स्वस्तिक गार्डन, सुभाषनगर येथील काळे याने शेख या बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती.
ठाणे : पुनर्विकासाचे काम मिळवून देतो, अशी बतावणी करून जाफर शेख (५५, रा. नागपाडा, मुंबई) या विकासकाला ७३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घालणा-या जयंत काळे (रा. सुभाषनगर, ठाणे) या भामट्याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाड्यातील महाजन सोसायटी या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम मिळवून देतो, अशी बतावणी दलालीचे काम करणाºया स्वस्तिक गार्डन, सुभाषनगर येथील काळे याने शेख या बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती. महाजन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशीही तसे बोलणे झाल्याचे त्याने भासवले. त्यानंतर, आॅक्टोबर २०१७ ते २५ फेब्रुवारी २०१९ या दोन वर्षांच्या काळात काळे याने महाजन सोसायटीचे लेटरहेड बनवून त्यावर सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या बनावट स्वाक्षºयाही करून पुनर्विकासासाठी अनुमती असल्याचा दावा केला. त्यानंतर, या सोसायटीच्या वतीने वृत्तपत्रांतही जाहिरात प्रसिद्ध करून बांधकाम व्यावसायिक शेख यांचा विश्वास संपादन केला. सोसायटीची पुनर्विकासाला अनुमती असल्याचा शेख यांनीही समज करून काळे याने सांगितल्याप्रमाणे त्याला आरटीजीएसद्वारे ७३ लाख १० हजारांची रक्कमही दिली. ठरल्याप्रमाणे शेख यांनी या इमारतीच्या पुनर्विकासासाठी काळे याच्याकडे तगादा लावल्यानंतर मात्र तो वेळकाढूपणा करत होता. अखेर, शेख यांनी या इमारतीच्या सभासदांकडे चौकशी केली असता, सोसायटीचा पुनर्विकास सध्या करायचा नसल्याची माहिती समोर आली. अखेर, सोसायटीच्या पुनर्विकासासाठी सभासदांनी इमारत रिकामी करण्यासाठी काळे याच्याकडे त्यांनी तगादा लावला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज केला.
२८ जूनला ताब्यात
सोसायटीचे अध्यक्ष माधव जोशी व सचिव अविनाश भोळे यांनीही विकासक शेख यांना काळे याने दिलेले लेटरहेड आणि त्यावरील स्वाक्षºया या बनावट असल्याचे सांगितले. हा प्रकार उघड झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. ओऊळकर आणि हवालदार व्ही.एस. सूर्यवंशी यांच्या पथकाने काळे याला अखेर २८ जून रोजी अटक केली.