विकासकाने केली १२ वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:54 AM2019-12-14T01:54:26+5:302019-12-14T01:55:11+5:30
वृक्ष प्राधिकरण समितीची २६ नोव्हेंबरला सभा झाली होती.
ठाणे : माजिवडा येथील बेथनी हॉस्पिटलजवळ बांधकामासाठी विकासकाने विनापरवानगी १२ वृक्षांची मुळापासून छाटणी केली आहे. ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत प्रशासनाने ही माहिती दिली असली तरी पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल केली नाही. विकासकावर प्रशासनाची मेहरनजर का असा सवाल करून समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव, सदस्य विक्रांत तावडे, संकेत दमामे यांनी कारवाईची मागणी केली आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीची २६ नोव्हेंबरला सभा झाली होती. या सभेत वृक्ष अधिकारी यांनी १३ प्रकरणे मांडली. १३ पैकी १२ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे म्हटले होते. म्हणजेच या तिन्ही प्रकरणांत नियमांना बगल देऊन वृक्षतोड झाली होती. गंभीर बाब म्हणजे माजिवडा येथील इमारतीच्या बांधकामासाठी भला मोठा खड्डा खणण्यात आला. यात ११ वृक्षांचे पुनर्रोपण, १ वृक्ष तोडणे आणि एका वृक्षाच्या फांद्या तोडण्यात येणार होते. मात्र, विकासकाने सरसकट १२ वृक्षांची कत्तल केली आहे.
प्रत्यक्ष दौरा करणार
वृक्षांची कत्तल होऊन इतके दिवस झाले तरी विकासकावर कारवाई न केल्याने ही खेदजनक बाब असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे. वृक्षांची कत्तल केली, त्या भागाचा तातडीने पाहणी दौरा करुन सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.