मराठी-गुजराती वादाप्रकरणी विकासकाला ‘मनसे’ समज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:48 AM2019-09-17T05:48:21+5:302019-09-17T05:48:40+5:30

राहुल पैठणकर यांना जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला.

Developer understands 'MNS' in Marathi-Gujarati debate | मराठी-गुजराती वादाप्रकरणी विकासकाला ‘मनसे’ समज

मराठी-गुजराती वादाप्रकरणी विकासकाला ‘मनसे’ समज

Next

ठाणे : नौपाड्याच्या विष्णुनगर भागातील रहिवासी राहुल पैठणकर यांना जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी क्षुल्लक कारणावरून मराठी-गुजराथी वादाची किनार देणाऱ्या हसमुख शहा यांना ‘मनसे स्टाइल’ने समज दिली. त्यानंतर, शहा यांनी या कृत्याबद्दल कान धरून माफी मागितल्याचाही व्हिडीओ मनसेने सोमवारी व्हायरल केला.
पैठणकर आणि शहा वास्तव्यास असलेल्या विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी हा वाद उद्भवला होता. या वादातून पैठणकर यांना शहा पितापुत्राने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचवेळी ‘मराठी-घाटी तुझी नौपाड्यात राहायची लायकी नाही’ असे आक्षेपार्ह उद्गारही त्यांनी काढले होते. याची गंभीर दखल घेत मनसेच्या अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफी मागायला भाग पाडू, असे आव्हान दिले होते. त्यानुसार, सोमवारी त्याला मुंबईत गाठून मनसे स्टाइलने ‘समज’ दिली. त्यानंतर, शहा यांनी कान धरून माफी मागितली. मराठी माणसाच्या नादाला लागणार नाही. लागलो तर महाराष्टÑ सोडून गुजरातमध्ये जाईल, असेही त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले. आपण राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कॅमेºयासमोर शिवीही देणार नाही आणि कोणाला मारहाण करणार नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
दरम्यान, याप्रकरणी राहुल पैठणकर आणि हसमुख शहा या दोघांनी एकमेकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. पैठणकर हे ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिलांना ठाणे रेल्वेस्थानक येथे सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना अटकाव करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या आणि डाव्या हाताला, डोक्याला तसेच डाव्या डोळ्याच्या खाली मार लागला. कहर म्हणजे ‘तुझे बाद मे देख लेता हूं’, अशीही धमकी दिल्याचे पैठणकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
>काँग्रेसनेही केला निषेध
शहा यांनी मराठी माणसाची लायकी काढून अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल, तसेच क्षुल्लक कारणावरून राहुल पैठणकर यांना केलेल्या अमानुष मारहाणीबद्दल समाजामध्ये तेढ निर्माण करणाºया प्रवृत्तीचा काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस ओबीसी विभागाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी विविध पदाधिकाऱ्यांसह जाहीर निषेध केला.
शहा हा विकासक मराठी माणसांच्या जिवावर मोठा झालेला आहे आणि अशा प्रकारे केलेले वक्तव्य कधीही मराठी माणसांकडून खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचे गुजराती समाजही कधीच समर्थन करणार नाही. त्यामुळेच ठाण्यातील नौपाडा भागात हसमुख शहा हे विकास करीत असलेल्या एका बांधकाम साइटवर बॅनर लावून काँग्रेसने निषेध नोंदविल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे. पैठणकर यांना केलेल्या मारहाणप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली. प्रदेश ओबीसी विभाग सरचिटणीस कृष्णा भुजबळ, श्रीकांत गाडीलकर, जे.पी. गुड्डू, संदीप यादव आणि सागर लबडे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Developer understands 'MNS' in Marathi-Gujarati debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.