भिवंडीतील आरक्षित भूखंडांवर विकासकांचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:05+5:302021-07-12T04:25:05+5:30
नितीन पंडित : लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या हद्दीत ५०हून अधिक आरक्षित भूखंड आहेत. परंतु, मनपा ...
नितीन पंडित : लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या हद्दीत ५०हून अधिक आरक्षित भूखंड आहेत. परंतु, मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे त्यांचा विकास झालेला नाही. अनेक आरक्षित भूखंडांवर विकासकांचा डोळा आहे. काही भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे, तर काही ठिकाणी बेकायदा बांधकामेही झाली आहेत. शहरात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच खेळाची मैदाने व आरक्षित भूखंड आहेत. त्यामुळे नागरिकांना सकाळी व सायंकाळी फेरफटका मारायला, तर लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागाच नाही.
शहरातील आरक्षित भूखंडांच्या विकासाकडे मनपा प्रशासनातील जबाबदार अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. आरक्षित भूखंडांचा विकास करून नागरिकांना त्याचा पुरेसा फायदा व्हावा, यासाठी उद्याने, खेळण्यासाठी मैदाने, अत्याधुनिक रुग्णालये, शैक्षणिक उपक्रम अथवा अन्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्याबाबत त्यांचे व्हिजनही नसल्याचे शहरातील जागरूक नागरिक सांगतात. याउलट स्थानिक लोकप्रतिनिधींसह सत्ताधारी व मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील आरक्षित भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. यामुळे शहर विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे.
शहरातील अनेक आरक्षित भूखंडांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. झोपडीधारकांनी केलेल्या बांधकामांमुळे शहरात बकाली वाढली आहे. चांगल्या व मोक्याच्या भूखंडांची अक्षरश: वाताहात झाली आहे. झोपडपट्टी भागात दाट लोकवस्ती असून, तेथील नागरिकांना सोयीसुविधाही पुरवण्यावर मर्यादा येत आहेत. अशा अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने वेळीच ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
-----------------