विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी
By धीरज परब | Published: March 11, 2023 10:46 PM2023-03-11T22:46:29+5:302023-03-11T22:46:44+5:30
सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
मीरारोड- मीरा भाईंदर मधील एका बड्या विकासकास ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांच्या खंडणी साठी धमकावत विविध मार्गाने त्रास देणाऱ्या तिघांवर काशीमीरा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा शुक्रवार १० मार्च रोजी दाखल केला आहे.
विकासक आनंद अग्रवाल, हरीश उर्फ मोंटू अग्रवाल व जॉर्डन परेरा या तिघांची भागीदारीतील ए कॉर्प नावाची बांधकाम व्यवसायाची कंपनी आहे. सदर तिघा विकासकांना काशीमीरा भागातील जमीन प्रकरणी ईडी ने नोटीस पाठवली असून ईडीने त्यांची चौकशी सुरु केल्याचे भाईंदर मधील इस्टेट एजंट गौतम अग्रवाल रा . सोरेटो , कंट्री क्लब समोर , अंधेरी याच्या कडून सांगितले जात होते . तर मितेश शाह रा . एसेन रियालिटी , डीमार्ट जवळ , भाईंदर याने सदर विकासकांना त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या नावे ईडीच्या दिल्ली कार्यालयाची व सत्येंद्र माथुरिया ह्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेली चौकशीची नोटीस दाखवली होती . मितेश याने विकासकांना सांगितले कि , गौतम अग्रवालचे ६ कोटी ५० लाख व मला ५ लाख द्या तर माथुरिया साहेबांना सांगून तुम्हाला ईडीची क्लीन चिट मिळवून देतो.
दुसरीकडे विकासक राजू शाह रा . हमिरमल टॉवर , भाईंदर पश्चिम हे देखील ती कथित ईडीची नोटीस पालिका आयुक्तां पासून संबंधित पालिका अधिकाऱ्यांना पाठवून आनंद अग्रवालच्या बांधकाम प्रकल्पा विरुद्ध तक्रारी करत होते . आनंद अग्रवाल व त्यांच्या भागीदारांना मात्र ईडी कडून तशी कोणतीच नोटीस मिळालेली नसल्याने त्यांना संशय आला . त्या ईडी नोटीसचा अर्धवट फोटो मितेश याने एकाच्या मोबाईल द्वारे अग्रवाल यांना पाठवला . त्यांनी सदर प्रकरणी ईडी कार्यालया कडे ऑक्टोबर २०२२ मध्ये त्या कथित नोटीस बाबत विचारणा केली. ईडी कार्यालयाने अग्रवाल यांना ईमेल द्वारे अशी कोणतीच नोटीस बजावलेली नसून ती फेक असल्याचे कळवले.
गौतम व राजू यांनी ईडीची ती बनावट नोटीस मार्फत विविध मार्गाने बदनामी चालवली होती. त्यामुळे आनंद यांनी जानेवारी महिन्यात पुन्हा ईडी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्या कार्यालयाने पुन्हा अशी कोणतीच नोटीस बजावली नसून तुम्ही पोलीस ठाण्यात बोगस नोटीस प्रकरणी फिर्याद देऊ शकता असे कळवले. त्यामेलच्या आधारे आनंद अग्रवाल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. भाईंदर पोलिसांनी चौकशी केली असता ईडीची तशी कोणतीच नोटीस नसल्याचे आढळून आले. आनंद अग्रवाल यांचा तक्रार अर्ज काशीमीरा पोलिसां कडे वर्ग केल्या नंतर पोलिसांनी गौतम अग्रवाल, मितेश शाह व राजू शाह विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम हे तपास करत आहेत.