'त्या' विकासकांनी अद्यापही फायर फायटींग वाहने पालिकेला दिलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:52 PM2021-06-18T15:52:59+5:302021-06-18T15:55:02+5:30
वाहने न देताच शहर विकास विभागाने देऊन टाकल्या ओसी
ठाणे : ज्या इमारतींचे बांधकाम १० लाख चौरस फुटांच्या वर असेल अशा विकासकांनी ओसी घेण्यापूर्वी ठाणो महापालिकेच्या अग्निशमन दलासाठी फायर फायटींग वाहने देणो बंधनकारक असतांना ही वाहने अद्यापही महापालिकेच्या अग्निशमन दलात सामीलच झाल्या नसल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. या अंतर्गत तब्बल ३३ फायर वाहने येणार होत्या. त्या अद्यापही आलेल्या नसतांना अशा विकासकांना मात्र ओसी देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कारकीर्दीत ज्या इमारतींचे बांधकाम १० लाख चौरस फुटांच्यावर झालेले असेल त्या इमारत धारकांनी ठाणो महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फायर फायटींगचे प्रत्येकी एक वाहन द्यावे असे स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही वाहने उपलब्ध झाल्यानंतरच संबधींत विकासकाला इमारतीची ओसी देण्यात यावी असेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.
१० लाख चौरस फुटांवर केलेल्या बांधकामांनापैकी किती विकासकांनी महापालिकेकडे फायर फायटींग वाहने दिली आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. परंतु शहर विकास विभागाने सध्या चार वाहनांची प्रकिया सुरु असल्याचे उत्तर देण्यात आले. पण ही वाहने केव्हा येणार याची माहिती मिळू शकली नाही. त्यातही महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे ३३ वाहने येणार होती असे पालिकेने स्पष्ट केले असतांना अद्यापही एकही वाहन पालिकेच्या सेवेत का दाखल झालेले नाही? असा सवालही मणोरा यांनी उपस्थित केला. परंतु याचे अपेक्षित उत्तर शहर विकास विभागाच्या अधिका:यांना देता आली नाही. त्यामुळे संतापलेल्या महापौर नरेश म्हस्के यांनी अधिका:यांची कान उघाडणी केली.
केवळ वृत्तपत्रत कौतुक मिळविण्यासाठी हा अटटाहास होता का? असा सवाल उपस्थित केला. वाहने न येता किती विकासकांना ओसी दिली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काही ठराविक विकासक आणि आर्कीटेकसाठीच काम केले जात आहे का? असा सवाल उपस्थित करीत शहर विभागाच्या अधिका:यांचे त्यांनी चांगलेच कान उपटले आहेत. या प्रक्रियेमुळे अग्निशमन विभागाला फायदा होऊन त्यांच्या खर्चातही बचत होणार असतांना ही प्रक्रिया का पूर्ण केली गेली नाही, अग्निशमन विभागाकडे किती वाहने आली आहेत, याचे उत्तरही त्यांनी मागितले. तर दोन वाहनांने आली असली तरी त्यांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे उत्तर अग्निशमन विभागाच्या अधिका:यांनी दिले.
महापौर त्यावरुन पुन्हा संतप्त झाले आणि त्यांनी तुम्ही पगार फुटक घेता का?, काम कशासाठी करता कामे करायची नसतील तर घरी बसा असे खडे बोल सुनावले. अखेर या संदर्भातील नेमकी प्रक्रिया काय झालेली आहे, याची माहिती घेऊन महासभेपुढे सादर केले जाईल असे उत्तर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. त्यानंतर महापौर म्हस्के यांनी ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करुन वाहने सेवेत दाखल करुन घ्यावीत असे सांगितले.