चाळ परिसराचा खुंटणार विकास, आयुक्तांचे पत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:25 AM2018-10-26T00:25:14+5:302018-10-26T00:25:18+5:30
गटारे आणि पायवाटांच्या कामांऐवजी रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहे.
कल्याण : गटारे आणि पायवाटांच्या कामांऐवजी रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहे. त्यामुळे चाळवजा वस्तीतील गटारे, पायवाटांची कामे करता येणार नसल्याने विकास खुंटणार आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२०१८-१९ या कालावधीत गटारे व पायवाटांच्या कामांचे प्रस्ताव न करता रस्त्यांचे प्रस्ताव तयार करावेत, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आयुक्तांनी रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, शहरातील झोपडपट्टी व चाळवजा वस्तीत गटारे, पायवाटा तयार न केल्यास तेथील रहिवाशांवर अन्याय केल्यासारखे होईल, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, ‘यूटीडब्ल्यूटी पद्धतीने रस्ता तयार करताना अनावश्यक बाबी करू नयेत, असे आयुक्तांनी अभियंत्यांना सूचित केले आहे. ज्या बाबींची आवश्यकता नाही, त्यांचा समावेश प्राकलनात करू नये, असे म्हटले आहे. जुन्या कल्याणमध्ये काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजीच झालेली नाही. त्यामुळे रस्त्याचे सोलिंग न करता यूटीडब्ल्यूटीचे काम केले, तर ते टिकणार नाही. त्यामुळे नगरसेवकांची त्रिधा स्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता वर आणि गटारे खाली गेली आहेत. त्यात समतलपणा नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार?’ तर, शिवसेनेचे नगरसेवक दया शेट्टी म्हणाले, ‘मोहन प्रभागात बहुतांश झोपडपट्टी आहे. तेथे गटारे व पायवाटांची कामेच झालेली नाहीत. त्यात आयुक्तांनी असे पत्रक काढले आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात कामांवर अन्याय होणार आहे.’
दुसरीकडे २०१७-१८ या आर्थिक वर्षातील नगरसेवक निधीचे प्रस्ताव शिल्लक आहेत, असे आयुक्तांनीच स्वत: कबूल केले आहे. त्यांच्या कबुलीमुळे मागच्या वर्षी कामे झालेली नाही. यावर्षीही ही कामे होणार नाहीत, हेच यातून उघड आहे. कामे प्रस्तावित करताना अभियंत्यांनी त्याची गरज किती आहे, याची प्रत्यक्षस्थळी पाहणी करावी. त्याचे फोटो काढावेत. काम झाल्यावरही फोटो काढावेत. काम प्रस्तावित करताना नगरसेवक निधीतून प्रस्तावित करण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर, भांडवली खर्चातून कामे प्रस्तावित करण्यास द्वितीय प्राधान्य असावे. काम प्रस्तावित करताना जागा खाजगी की सरकारी आहे, याची शहानिशा करावी, असे म्हटले आहे.
>कार्यभाराकडे दुर्लक्ष
महापालिकेतील बऱ्याच कनिष्ठ व उपअभियंत्यांना उच्च पदाचा कार्यभार दिला आहे. त्यामुळे हे अधिकारी मूळ पदाऐवजी उच्च पदाचा कार्यभार सांभाळण्याकडे अधिक लक्ष देतात. त्यांनी मूळ पदाचे काम आधी पाहावे. त्यानंतर, उच्च पदाची जबाबदारी पार पाडावी, असे आयुक्तांनी सूचित केले आहे.