पवार जेवलेल्या ‘त्या’ झोपडीचा होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:35 AM2020-02-06T00:35:39+5:302020-02-06T00:36:42+5:30
रामचंद्र खोडके आणि पत्नी कमल यांना दोन मुले असून मुलगा दहावीत, तर मुलगी सातवीत शिकत आहे.
कसारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वाऱ्याचापाडा येथे ज्या झोपडीत बसून जेवले, त्या आदिवासी दाम्पत्याला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश सांबरे, बबन हरणे, हरेश पष्टे यांच्या सहकार्याने घर बांधून देणार, असे जाहीर केले होते. दुसऱ्याच दिवशी बांधकाम साहित्य आले. आता प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
रामचंद्र खोडके आणि पत्नी कमल यांना दोन मुले असून मुलगा दहावीत, तर मुलगी सातवीत शिकत आहे. मोलमजुरीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाचे कुडाचे चंद्रमौळी घर आहे. त्यांना कधी वाटले नसेल की, आपण पक्कया घरात राहण्यासाठी जाऊ.नशिबाची जोरदार साथ असलेल्या खोडके कुटुंबाच्या झोपडीत पवार यांनी जेवणाचा आस्वाद घेताघेता या गरीब कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली.
अठरा विश्वं दारिद्रयात अडकलेल्या या कुटुंबाला राहण्यासाठी छान असे घर बांधून देण्याचा निश्चय पवारांनी केला व आपल्या नेत्याचा शब्द कानी पडताच दुसऱ्याच दिवशी बांधकाम साहित्य आणले. या महिन्यातच घराचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास जिजाऊ संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.