‘विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:33 AM2017-08-05T02:33:20+5:302017-08-05T02:33:20+5:30
मुंबई महापालिकेचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. परंतु, दुसरीकडे ठाणे महापालिकेचा विकास आराखडा मागील २५ वर्षांत ११ टक्केच राबवण्यात आला आहे.
ठाणे : मुंबई महापालिकेचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. परंतु, दुसरीकडे ठाणे महापालिकेचा विकास आराखडा मागील २५ वर्षांत ११ टक्केच राबवण्यात आला आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नसून वाहतूककोंडीची समस्या पावलोपावली जाणवते.
ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. शहरातील विविध भागांतून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते आजही अरुंद आहेत. त्यामुळे आता हा विकास आराखडा कधी पूर्णपणे राबवला जाणार, असा सवाल केला जाऊ लागला आहे. ठाणे महापालिकेचा विकास आराखडा १९९९ साली मंजूर झाला. तर, त्याचा काही भाग २००१ साली मंजूर करण्यात आला. आजघडीला शहरातून जाणारा मुंबई नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद अशा दोन्ही महामार्गांवरील जंक्शनवर प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. या मार्गांवर उड्डाणपूल उभारले असले तरी वाहतूककोंडी काही कमी झालेली नाही.
ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाºया रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला असून त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे ऐन सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत ठाणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची लांबी एकूण ३५६.४० किमी इतकी आहे. त्यापैकी १०८ किमीचे रस्ते काँक्रिट आणि यूटीडब्ल्यूटी पद्धतीने तयार केले आहेत. तर, उर्वरित २४८.४० किमीचे रस्ते डांबरी आहेत. डांबरी रस्ते सातत्याने उखडत असल्याने त्यावर सतत डांबराचा लेप चढवला जातो.
या कामांच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु, वारंवार रस्ते उखडत असल्याने केलेला खर्च जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. यंदाही हीच समस्या जाणवत आहे.