"भिवंडीची बकाल शहर ओळख पुसण्यासाठी विकास आराखडा लोकाभिमुख असावा"
By नितीन पंडित | Published: September 19, 2022 06:40 PM2022-09-19T18:40:52+5:302022-09-19T18:41:48+5:30
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मनपा प्रशासनास सूचना
नितीन पंडित, भिवंडी: भिवंडी शहराची ओळख बकाल शहर म्हणून करून दिली जात असताना ती ओळख पुसण्यासाठी बनविला जाणार विकास आराखडा हा लोकाभिमुख असावा अशा सूचना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मनपा प्रशासनास केल्या आहेत. सोमवारी महानगरपालिकेच्या २०२३ मध्ये बनविल्या जाणाऱ्या विकास आराखड्या संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. सेवा सप्ताह अंतर्गत भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात भिवंडी विकास आराखडा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ,अति आयुक्त ओमप्रकाश दिवटे,शहर अभियंता एल पी गायकवाड,नगररचनाकार अनिल एलमाने,सहाय्यक संचालक नगररचना स्मिता कलकुटकी यांसह पालिका अधिकारी उपस्थित होते.
बऱ्याच वेळा प्रशासन विकास आराखडा कार्यालयात बसून बनवीत असते असे न करता नागरीकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्या विकास आराखड्यात असणे आवश्यक असून त्यासाठी नागरीकांना काय हवं आहे कोणत्या सुविधा हव्या आहेत यांच्या सूचना नागरिकांकडून घेऊन त्यावर प्रशासनाने काम करण्याची गरज आहे.तरच आपण शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात यशस्वी होऊ असे सांगत विकास आराखडा बनविताना शहराची जुनी दाटीवाटीचे बकाल शहर ओळख पुसून नवीन ओळख निर्माण करायची असेल तर शहरात उद्यान,क्रीडांगण,दळणवळण सुविधा,नाट्यगृह,पर्यटन यावर भर देणे गरजेचे आहे असे स्पष्ट करीत कपिल पाटील यांनी वऱ्हाळ तलाव सुशोभीकरण करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सीएसआर फंडातून १५ कोटी रुपये तलाव सुशोभीकरणासाठी उपलब्ध होणार असून,त्याच परिसरात सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासोबत शहरात सुसज्य रुग्णालय,आंतरराष्ट्रीय क्रीडा खेळाडू निर्माण व्हावे यासाठी इनडोअर क्रीडांगण बनविण्यासाठी आराखड्यात प्राधान्य देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.
बैठकीच्या सुरूवातीला आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी कपिल पाटील यांचे स्वागत करीत यापूर्वी विकास आराखडा २००३ मध्ये बनविण्यात आले होता त्यानंतर २०२३ चा विकास आराखडा हा २०४२ ची लोकसंख्या दृष्टीक्षेपात ठेवून हा विकास आराखडा बनविण्याचे काम केले जात असल्याचे प्रास्ताविकात सांगितले .