पालिकेच्या तीन भूखंडांचा बीओटी तत्त्वावर होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:26 AM2018-11-01T00:26:54+5:302018-11-01T00:27:08+5:30
महापालिकेकडे मालकी हक्क हस्तांतरीत झालेले तिन्ही भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे.
उल्हासनगर : महापालिकेकडे मालकी हक्क हस्तांतरीत झालेले तिन्ही भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. स्थायी समिती बैठकीत हा विषय आला असून विकासाच्या नावाखाली काही राजकीय नेत्यांचा श्रीखंड खाण्याचा डाव असल्याची टीका पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी केला आहे.
उल्हासनगरमधील आरक्षित भूखंडावर पालिकेचा ताबा असला तरी, भूखंडावर राज्य सरकारची मालकी आहे. शहर विकासासाठी व्हीटीसी मैदान, हिराघाट बोटक्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट व आयडीआय कंपनीजवळील आरक्षित भूखंड आदींची मालकी पालिकेकडे हस्तांतराची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, नगरविकास विभागाकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी केली. महापौरपदी पंचम कलानी विराजमान झाल्यावर काही दिवसातच चारही भूखंडाची मालकी पालिकेकडे हस्तांतरीत झाली. आयडीआय कंपनीजवळील भूखंड कबरस्तानाला देण्यात आला. स्थायी समिती बैठकीत तिन्ही भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याने, भूखंडाचे श्रीखंड तर राजकीय नेते खात तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.
पालिकेनेच विकास करावा
क्रीडासंकुलासाठी राज्य सरकारकडून निधी आला असून क्रीडासंकुलाची संकल्पना विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांची आहे.
बीओटी ऐवजी पालिकेने सरकारकडे विशेष निधी मागून भूखंड विकसित करावेत, असे राजेंद्र चौधरी म्हणाले.