‘वालधुनी’चा विकास हीच देवळेकरांना श्रद्धांजली ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:45 AM2020-09-26T00:45:03+5:302020-09-26T00:45:11+5:30
केडीएमसी : अधिकारी, नगरसेवकांनी जागवल्या आठवणी, वक्तृत्वाने सभागृह मूळ विषयावर आणण्याची हातोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक दिवंगत राजेंद्र देवळेकर यांना शुक्रवारी केडीएमसीतील अधिकारी आणि नगरसेवकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. २००५ च्या महाप्रलयानंतर देवळेकर यांनी वालधुनी नदीच्या विकासाचा ध्यास घेतला होता. हे त्यांचे कार्य अधुरे राहिले असून ते पूर्ण करणे, हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत यावेळी भावना व्यक्त करण्यात आल्या.
देवळेकर यांचे बुधवारी निधन झाले. केडीएमसी मुख्यालयातील महापालिका भवनात शुक्रवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते राहुल दामले, सभागृह नेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, सुधीर बासरे, वरुण पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, सचिव संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त रामदास कोकरे, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आदी उपस्थित होते.
२००५ च्या महापुरानंतर वालधुनी नदी विकास प्राधिकरण स्थापन झाले. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. देवळेकरांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी खूप पाठपुरावा केला होता. परंतु, हे अर्धवट राहिलेले काम पूर्ण व्हायला पाहिजे.
मुरबाड रोडवरील भवानी चौकातील प्रस्तावित पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलासाठीही देवळेकर व दिवंगत नगरसेवक दशरथ घाडीगावकर यांनीही विशेष पुढाकार घेतला होता. आता आयुक्तांनी यात विशेष लक्ष घालावे. हे दोन्ही प्रकल्प लवकर मार्गी लागावेत, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, याकडे पेणकर यांनी लक्ष वेधले.
सभागृहात एखाद्या विषयावर चर्चेदरम्यान नगरसेवकांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रसंग घडले. परंतु, देवळेकरांमध्ये वक्तृत्वाने सभागृह मूळ विषयावर आणण्याची हातोटी होती. २५ वर्षे नगरसेवकपदी राहिलेल्या देवळेकरांकडून खूप काही शिकता आले, अशा शब्दांत दामले यांनी भावना व्यक्त केल्या.
येत्या १ आॅक्टोबरला केडीएमसीला ३७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यातील २५ वर्षे देवळेकरांनी या महापालिकेत नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांच्या वक्तृत्वाची छाप महासभेत पाहायला मिळाली, पण जेव्हाजेव्हा कधी मला संपर्क करायचे, यात ते नेहमीच लोकोपयोगी कामांवर बोलायचे, अशा भावना डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या.
महापौर राणे, विश्वनाथ राणे, सचिव संजय जाधव, नगरसेवक वरुण पाटील यांनीही भावना व्यक्त केल्या. देवळेकर अत्यंत अभ्यासू असे नगरसेवक होते असे या मान्यवरांनी सांगितले. यावेळी पालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवकांची उपस्थिती नगण्य
च्देवळेकर हे केडीएमसीतील ज्येष्ठ नगरसेवक होते. स्थायी समिती सभापती, महापौरपदही त्यांनी भूषवले. मात्र, शुक्रवारी श्रद्धांजली सभेच्या वेळी नगरसेवकांची उपस्थिती नगण्य होती.
च्केडीएमसीत शिवसेनेचे ५४ नगरसेवक आहेत. परंतु, यावेळी केवळ पाचच नगरसेवकांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. सभागृह नेत्यांच्या कार्यालयातून सेनेच्या नगरसेवकांना यावेळी उपस्थित राहण्यासंदर्भात कळवण्यात आले होते.
च्याप्रसंगी भाजपचेही दोनच नगरसेवक उपस्थित होते. तर, अन्य पक्षांतील एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.