जलमार्गाचा विकास करा, नितीन गडकरी यांची सूचना; एमएमआरडीए क्षेत्र ग्रोथ सेंटर होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:59 AM2018-01-12T01:59:07+5:302018-01-12T01:59:39+5:30
दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर होऊन वाहतुक बंद पडली. मुंबईत तशी स्थिती येण्याचे दिवस फार दूर नाहीत, असा इशारा देतानाच मंत्री, खासदार, आमदारांनी वेळीच हा धोका ओळखावा; प्रदुषणमुक्त वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक परिवहन सेवा, जलमार्गाचा विकास करावा, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी दिला.
मीरा रोड/भार्इंदर : दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर होऊन वाहतुक बंद पडली. मुंबईत तशी स्थिती येण्याचे दिवस फार दूर नाहीत, असा इशारा देतानाच मंत्री, खासदार, आमदारांनी वेळीच हा धोका ओळखावा; प्रदुषणमुक्त वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक परिवहन सेवा, जलमार्गाचा विकास करावा, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी दिला.
ठाणे, पालघर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कोटींच्या रस्ते, पूल विकासकामांचे भूमिपुजन करताना ते बोलत होते. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास हा जल, आकाश, भूमिगत व जमीन अशा चारही मार्गांनी होत असून यातून निर्माण होणाºया पायाभूत सुविधांमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. दळणवळणाचे अधिक पर्याय मिळतील आणि हा परिसर ग्रोथ सेंटर होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा ई भूमिपुजन सोहळा मीरा रोड येथे आयोजितकेलाहोता. या वेळी गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार कपील पाटील, गोपाळ शेट्टी, आमदार हितेंद्र ठाकुर, मनिषा चौधरी, नरेंद्र मेहता, रवींद्र फाटक, आनंद ठाकूर, अमित घोडा, विलास तरे, क्षितीज ठाकूर, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, वसई-विरारचे महापौर रुपेश जाधव आदींसह प्राधिकरणाचे ए. के. सिंह, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील, पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते आदी उपस्थित होते. मात्र शिष्टाचार न पाळल्याने सेनेचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
वरसावे पुलाचे काम अडीच वर्ष रेंगाळले. ठेकेदारांमध्ये वाद झाला. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकलो. पण, पर्यावरणाची मंजुरी नव्हती. समितीचा अध्यक्ष आयएएस हवा असल्याने त्याला विलंब झाला, असा तपशील गडकरी यांनी पुरवला आणि उशीर झाल्याने झालेल्या त्रासाबदद्ल क्षमा मागितली. पुलाच्या कामासाठी २४ महिन्यांची मुदत असली, तरी मुख्यमंत्री आणि वाहतुक पोलिसांचे सहकार्य मिळाले, तर १८ महिन्यांत काम करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर २० हजार कोटी खर्च करून मुंबई-बडोदा असा एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय आहे. त्याचे गुजरातमधील भूसंपादन झाले असून महाराष्ट्रातील शिल्लक आहे. तीन महिन्यात त्याच्या कामाला सुरवात होईल. मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी भूसंपादनाचा तिढा सोडवला, तर काम दीड महिन्यातच सुरु करु. मीरा-भार्इंदरला या एक्सप्रेस वे शी जोडण्यासाठी २६ किमीचा मार्ग बांधावा लागेल. त्यासाठी दोन हजार कोटीचा खर्च आहे. पण या मार्गात अनेक इमारती असल्याने ते आमदार नरेंद्र मेहता यांनी क्लियर करुन द्यावे. त्यानंतर तेही काम सुरु करु, असे गडकरी म्हणाले.
जेएनपीटीतील कंटेनर ट्रॅफिकचा त्रास पनवेल, मुंबई, ठाणे, पालघरमधील नागरिकांना होतो. तेथील केटनर हातळणीची क्षमता दुप्पट झाल्याने त्रास वाढतो आहे. वरसावे खाडी पुलाजवळ वसई-विरार भागात जमीन घेऊन जलमार्गे कंटेनर आणण्याची योजना तयार करण्यास सांगितले आहे. मुंबई ते दिल्ली महामार्गावर एक मार्गिका असलेला केबल इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे, असे सांगून ते म्हणाले, देशाला समुद्र व खाड्यांचा साडेसात हजार किमीचा किनारा असल्याने जलवाहतुकीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी मुंबई परिसरात रिव्हर पोर्ट, रिसिव्ह पोर्टसाठी ५५ ते ६० जेट्टींना मंजुरीचा निर्णय घेतला असून त्यातील २० ते २२ जेट्टी मंजूर झाल्या आहेत. मुंबई परिसरात जेवढ्या जेट्टी, सी पोर्ट बांधायचे असतील, त्याचे प्रस्ताव पाठवा. त्यांना मी मंजुरी देईल.
शिवसेना खासदार-आमदारांची पाठ
कार्यक्रमाकडे शिवसेनेचे स्थानिक खासदार राजन विचारे व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठ फिरवली. पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी मात्र उपस्थित होते. ही सर्व विकासकामे विचारे व सरनाईक यांच्या मतदारसंघात असूनही महामार्ग प्राधिकरणाने त्यांना विश्वासात घेतले नाही. उलट मतदारसंघ नसणाºया भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना प्राधान्य दिले. निमंत्रण पत्रिकेतही मेहता यांच्यानंतर सरनाईकांना स्थान दिले. सर्व कार्यक्रम भाजपाने हायजॅक केल्याचे चित्र होते.
वांद्रे ते वर्सोवा सी-लिंकला प्राधान्य द्या
भाऊच्या धक्का येथून रो-रो सेवा सुरू करत आहे. त्यामुळे मांडवा १५ मिनिटात, तर नेरळला १३ मिनिटात पोचता येईल. त्याला जोडून अलिबाग-वडखळ काँक्रिट मार्गामुळे मुंबईकरांना गोवा महामार्गावर अर्ध्या तासात जाता येईल. न्हावा शेवा-शिवडी प्रकल्प, समृद्धी महामार्ग, मुंबईचा सागरी मार्ग आदींमुळे मुंबईला दिलासा मिळेल, असे सांगून वांद्रे ते वर्सोवा सी-लिंकला प्राधान्य देत माझे स्वप्न पूर्ण करा, असे गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
एक लाख कोटींची कामे सुरू
सध्या राज्यात सुमारे एक लाख कोटींची कामे केंद्राच्या माध्यमातून सुरु आहेत. पाणीयोजना, मलनिस्सारण, मेट्रो, रस्ते आदी विविध योजनांची कामे राज्य व केंद्राच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात हाती घेतल्याने मोठे परिवर्तन होत आहे. हे अर्थव्यवस्थेचे केंद्र बनले आहे. गेल्या ७० वर्षात राज्यात राष्ट्रीय महामार्ग फक्त पाच हजार किमी लांबीचे होते. पण आता सुमारे २० हजार किमी लांबीचे महामार्ग होणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. वरसावे पुलाबाबत गडकरी यांच्या विधानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी तेथेच जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आदींना पुलाच्या कामात जी मदत लागेल ती करण्याचे निर्देश दिले.
‘तिकिटांचे दर होतील निम्मे’
रोप वे, केबल कार आदींना मी प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी परदेशी कंपन्यांशी करार करतो आहे. येत्या दोन वर्षात १० हजार सी प्लेन आणणार असून मुंबईच्या समुद्रात त्याची चाचणी घेतली. तीन महिन्यात त्याची नियमावली तयार करणार आहे. रस्ता व समुद्रमार्गे चालणारी नवी एमपीबीएस बस सुरु करा. त्यासाठी सर्व मदत करु. पालिकांना पेट्रोल-डिझेलचाा वापर कमी करण्याची सूचना करत ईथॅनॉल, मिथॅनॉल, बायो डिझेल, बायोसीएनजी, इलेक्ट्रिक इंधनाचा वापर करा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी बचत होऊन तिकिटांचे दर निम्मे होतील, असे गडकरी म्हणाले.
मुंबईची लोकसंख्या वाढते आहे. कितीही पुल- रस्ते बांधले तरी वाहतुक कोंडी राहील. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने लोकांचे जीवन सुसह्य करण्याची गरज आहे. त्यासाठी नवी सॅटेलाईट डेव्लपमेंट सिटी उभारणे, उद्योगांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. एकत्रित वाहतुक व्यवस्थेची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
गडकरी यांचा विकासकामांचा पाऊस
एक हजार ६५ कोटींच्या वडपे-ठाणे रस्त्याचे सहा व आठ पदरीकरण
११८९ कोटींच्या पालघर- जव्हार - मोखाडा - घोटी सिन्नर मार्गाचे नुतनीकरण
तलासरी-सूत्रकार येथे दुपदरीकरणासाठी ३६ कोटी ३७ लाख
महामार्ग ८४८ अ च्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन
कल्याण-माळशेज मार्गाचे नूतनीकरण
जुन्या भिवंडी मिसिंग लिंक रोडसाठी ४८ कोटी
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली मार्गासाठी ३०० कोटी
भिवंडी- पारोळ रस्ता
वाशी- कल्याण - इगतपुरी रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल
पालघरच्या सातीवली, मालजीपाडा, धानीवली येथे भुयारी मार्ग
वांद्रे ते वर्सोवा सी लिंकच्या निविदेला ३१ मार्चपर्यंत मंजुरी देऊन काम सुरु करणार आणि तो पुढे वसई-विरारपर्यंत नेणार.
बोरिवली- गोराई - वसई जलवाहतुकीला मान्यता दिली आहे.