फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:57 PM2023-04-04T14:57:34+5:302023-04-04T14:59:12+5:30
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ठाणे-
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेशी प्रामाणिक राहून गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा. महिलांचा सन्मान हे काही नुसतं बोलून होत नाही. उगाच फुकाच्या यात्रा काढू नका. तुमच्यात जर आरोपींवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर राजीनामा द्या, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. रोशनी ठाकरे यांची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे गेले. पण आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नव्हते. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या विश्रामगृहात या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
गुंडांचं ठाणे बनत चाललंय
"महिलांचा सन्मान करणारं ठाणे, दिघे साहेबांचं ठाणे, सुशिक्षित लोकांचं ठाणे अशी ठाण्याची ओळख होती. ती आता गुंडांचं ठाणे अशी ओळख होऊ लागली आहे. ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागलीय. एक गोष्ट मिंधे गटानं लक्षात घ्यावी की आम्ही आमच्यावरील संस्कारांमुळे शांत आहोत. पण जर ठरवलं तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही
उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे हल्ला प्रकरणी अद्याप साधा एफआयआर देखील नोंदवून घेण्यात आलेला नसल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला. "सुरक्षित महाराष्ट्र आणि महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र म्हणून तुम्ही मिरवता. पण इथं एका महिलेला मारहाण होती आणि अजूनही तिचा एफआयआर नोंदवून घेण्यात आलेला नाही. एका महिलेल्या पोटात लाथा मारण्यात आल्या. त्या मातृत्वासाठीचे उपचार घेत होत्या. याची कल्पना देऊनही महिला गुंडांनी त्यांना पोटात लाथा मारल्या. हे अतिशय निघृण काम आहे. अजूनही तुम्ही जर लाचारपणाच दाखवणार असाल तर गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. महिलांचा सन्मान करता येत नसेल तर उगाच सावरकर गौरव यात्रा वगैरे फुकाच्या यात्रा काढू नका. आधी राजीनामा द्या", असं उद्धव ठाकरे म्हणाले.