देवीचापाडा गावदेवीची जत्रा सुरू
By Admin | Published: April 19, 2017 12:17 AM2017-04-19T00:17:25+5:302017-04-19T00:17:25+5:30
नवसाला पावणारी, अशी ख्याती असलेल्या मोठागाव देवीचापाडा गावदेवी लोटूआईच्या जत्रेला मंगळवारपासून शुभारंभ झाला.
डोंबिवली : नवसाला पावणारी, अशी ख्याती असलेल्या मोठागाव देवीचापाडा गावदेवी लोटूआईच्या जत्रेला मंगळवारपासून शुभारंभ झाला. पहाटे परंपरेप्रमाणे गावदेवी संस्थानाचे अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे यांनी मंदिरात देवीची यथसांग पूजा व सपत्नीक अभिषेक केला. त्यानंतर मंदिर देवीच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
मंगळवार आणि बुधवार असा दोन दिवस हा उत्सव चालणार आहे. मंगळवारी पालखी सोहळा तर बुधवारी मुख्य जत्रा असेल, अशी माहिती संस्थानातर्फे देण्यात आली. भव्य रोषणाई, देवीच्या मुखवट्यासह गाभाऱ्याची सुबक सजावट करण्यात आली होती. देवीला सुंदर दागिन्यांचा शृंगार करण्यात आला. बुधवारी कुस्ती सामने होणार आहेत. त्यासाठी खेळाडूंनी मंदिर संस्थानाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष म्हात्रे यांनी आवाहन केले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास चांदीची गदा तसेच अन्य विजेत्यांनाही बक्षिसेही दिली जातील, असे सांगण्यात आले.
देवीचापाडा परिसरात अबालवृद्धांसाठी मनोरंजन आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
संस्थानाचे सर्व पदाधिकारी त्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. अत्यंत उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात ही जत्रा होत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)