राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या देवकी राजपूत यांची सुवर्ण कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 07:36 PM2018-01-12T19:36:26+5:302018-01-12T19:44:48+5:30
ठाणे : नवी मुंबईत ६ ते ११ जानेवारीदरम्यान झालेल्या तिसाव्या महाराष्ट राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील देवकी देवीसिंग राजपूत यांनी ज्युदो आणि कुस्ती या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांनी सलग ५ वर्षे पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपला ठसा उठवून शहर पोलीस दलाची मान उंचावली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यांची राष्टीय पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
या स्पर्धेतील कुस्तीच्या ५९ किलो वजनी गटात खेळताना, देवकी यांनी कोकण रेंजच्या स्वाती सहाणे, नाशिकच्या ज्योती झुगे आणि पुणे शहर पोलीस दलाच्या हेमलता घोडके या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तसेच ज्युदो या प्रकारातील ६३ किलो वजनी गटातही देवकी यांनी कोकण रेंजच्या लतादेवी, नाशिकच्या ज्योती झुगे आणि मुंबई रेंजच्या स्वाती धोत्रे या प्रतिस्पर्ध्यांना नमवून पुन्हा सुवर्णपदक पटकावले.
देवकी या मागील पाच वर्षांपासून राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असून त्यांनी ज्युदो आणि कुस्ती या प्रकारांत सातत्याने कामगिरी बजावून सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. तसेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पोलीस गेम-२०१५ या स्पर्धेतील कुस्ती गटात कांस्य, तर २०१६ साली हरियाणा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल दोन पदोन्नती मिळवून त्या हवालदारपदी कार्यरत आहेत.