अंगारकीला श्री गणेश मंदिरात भक्तांना प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:33+5:302021-03-04T05:15:33+5:30
डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता टिटवाळा येथील महागणपतीचे दर्शन बंद ठेवलेले असतानाच तेथे दर्शनाला जाता येत नाही म्हणून ...
डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता टिटवाळा येथील महागणपतीचे दर्शन बंद ठेवलेले असतानाच तेथे दर्शनाला जाता येत नाही म्हणून भक्त डोंबिवलीत फडके पथ येथील श्री गणेश मंदिर संस्थानाच्या मंदिरात गर्दी करण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने मंगळवारी भक्तांसाठी दर्शन व्यवस्था दिवसभरासाठी बंद ठेवली होती.
याबाबत संस्थानाचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले की, मंदिर प्रशासनाने भक्तांच्या काळजीसाठी निर्णय घेऊन मंगळवारी पहाटेपासून पूर्ण दिवसभर दर्शन बंद ठेवले होते. भक्तांना प्रवेशद्वारातून गणेशाचा फोटो ठेवून रांगेतूनच दर्शन घेण्याची सोय केली होती. दिवसभर भक्तांनी रांगेतून रस्त्यावरून दर्शन घेतले, तेथेच त्यांनी आणलेला प्रसाद, हार घेऊन ते परत दिले जात होते. तसेच ज्यांना देणगी, अभिषेक करायचा होता ते स्वीकारण्याचीही सोय केली होती. सोवळ्यातील भटजी हे भक्तांना मार्गदर्शन करीत होते. तसेच द्वारपाल भक्तांना फिजिकल डिस्टन्स पाळण्यासंदर्भात मार्गदर्शन करीत होते. गणेशाच्या मूर्तीचे दर्शन नाही मिळाले तरीही बाहेरून प्रवेशद्वारावर दर्शन सोय केल्याने भक्तांनीही मंदिर प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करून सहकार्य केले. बुधवारपासून नित्य ठरल्याप्रमाणे कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दर्शन सुविधा असेल, असेही सांगण्यात आले.
----------