बाप्पाच्या प्रसादाला भक्तांची पसंती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:38+5:302021-09-08T04:48:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली असताना दुसरीकडे बाप्पासाठी लागणाऱ्या प्रसादाच्या पदार्थांचीदेखील ...

The devotees continue to like Bappa's prasada | बाप्पाच्या प्रसादाला भक्तांची पसंती कायम

बाप्पाच्या प्रसादाला भक्तांची पसंती कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली असताना दुसरीकडे बाप्पासाठी लागणाऱ्या प्रसादाच्या पदार्थांचीदेखील खरेदी सुरू झाली आहे. प्रसादाला मागणी कायम असून, यावर कोरोनाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा पारंपरिक प्रसादाला ड्रायफ्रूट्सची जोड असल्याचे पाहायला मिळत आहे.

येत्या शुक्रवारी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. दिवस जवळ येत असल्याने सकाळ-संध्याकाळ बाजारात गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सव अधिक आकर्षक आणि देखणा करण्याचा प्रयत्न घराघरात केला जातो. त्याला अनुसरून आरासही सजविली जाते. सर्वच बाबतीत सुशोभित आणि डिझायनर गोष्टींची निवड करत असताना बाप्पाचा प्रसादही यंदा विविधरंगी आणि हटके आकारांमध्ये दिसणार आहे. दरदिवशी वेगवेगळा प्रसाद बाप्पांसमोर ठेवण्याचा भक्तांचा प्रयत्न आहे. त्यानुसार प्रसादाचे पदार्थ खरेदी केले जात आहेत. उकडीचे मोदक, शिरा यांसोबत विविध पदार्थदेखील बाजारात आहेत.

रेडिमेड उकडीच्या मोदकांना जशी मागणी आहे तसेच मोदकांच्या रेडिमेड पिठालादेखील मागणी असल्याचे दुकानमालक महेश पिंपळीकर यांनी सांगितले. प्रसादासाठी मिक्स ड्रायफ्रूट्सचा वापर करण्याचा ट्रेंड असून, सध्या त्याची चलती आहे. यंदा मिक्स ड्रायफ्रूट्स ६०० रुपयांवरून ७०० रुपये झाले असे पिंपळीकर म्हणाले. खोबरे, खारीक, काजू, वेलची, साखर, बेदाणे या पदार्थांचे पंचखाद्य (खिरापत), ११ आणि २१ नगचे आंबा मोदक, केशर, केशर वेलची सिरप, जायफळ पावडर, वेलची पावडर, दूध मसाला, किसलेले सुके खोबरे, गुळाची पावडर, गुळाची ढेप, कोल्हापुरी गूळ, साखर फुटाणे, नैवेद्यासाठी शेवया, गवले, साजूक तूप या पदार्थांचीदेखील खरेदी सुरू आहे.

.....

मोदक पीठ, मिक्स ड्रायफ्रूट्स या पदार्थांना गणेश भक्तांची मागणी असून, तसेच प्रसादासाठी लागणारा कच्चा मालदेखील बुकिंग न करता ग्राहक थेट घेऊन जात आहेत. अनेकांचे ग्राहक ठरलेले असल्याने कोरोनामुळे खरेदीवर परिणाम झालेला नाही.

- महेश पिंपळीकर

Web Title: The devotees continue to like Bappa's prasada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.