पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ!
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 24, 2023 03:13 PM2023-09-24T15:13:01+5:302023-09-24T15:13:06+5:30
स्वीकृत केंद्राकडे भाविकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.
ठाणे : पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी मूर्तींचे विसर्जन केले. स्वीकृत केंद्राकडे भाविकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.
महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरीक्त आयुक्त (२)प्रशांत रोडे यांनी पाहणी केली. तसेच, गणेश भक्तांचे सहकार्याबद्दल आभारही मानले.
महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४४८ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर घाट येथे विधिवत विसर्जन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. त्यात रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुर्ननिर्माणचे सदस्य मदत करतात.
पाच दिवसाच्या गणेश मूर्ती व गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १५ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १० टन निर्माल्य संकलन झाले होते. विशेष म्हणजे प्लास्टिकचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.