हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ ठाण्यात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:03 PM2018-08-28T17:03:58+5:302018-08-28T17:05:56+5:30
ठाण्यात आज हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ संपन्न झाला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील शाळा सहभागी झाल्या होत्या.
ठाणे : बाळ गोपाळ मित्र मंडळ सह नारळवाला चाळ, ठाणे व पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात हा महोत्सव संपन्न झाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी अवयवदानाची ही दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद साजरा केला.
कार्यक्रमाला पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेश मढवी, विनायक जोशी, विलास जोशी आणि आयोजक विलास ढमाले उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी पूजन करण्यात आले व ही दहीहंडी फोडण्याचा मान महापालिकेच्या जिद्द शाळेला देण्यात आला. यावेळी अस्तित्व मतीमंद व मुकबधीर मुलांची शाळा, डोंबिवली, कमालिनी कर्णबधीर विद्यालय, ठाणे, झवेरी ठाणावाला, ठाणे, जिव्हाळा मुकबधीर शाळा, ठाणे, हॉलीक्रॉस शाळा, ठाणे या शाळांतील विद्यार्थ्यांनीही दहीहंडी फोडली. यावेळी मुलांनी ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय म्हणत’ उत्साहाने मानवी मनोरे रचत हंडी फोडली. या मुलांपैकी कोणी राधाच्या तर कोणी कृष्णाच्या वेशभूषेत आले होते. त्यांची वेशभूषा बघ्यांची लक्ष वेधून घेत होती. समस्त ठाणेकरांनी या सर्व बाळगोपाळांचे कौतुक केले. त्यानंतर गरजूंना वह्या व औषधे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित पालक आणि नागरिकांना अवयवदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.