भाईंदर मध्ये सदानंद बाबांच्या जन्मगावी भक्तांचा रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:10 PM2019-08-29T23:10:31+5:302019-08-29T23:13:03+5:30
संतप्त भक्तांनी आज गुरुवारी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. दोन वेळा रास्ता रोको करण्यात आला.
मीरारोड - तुंगारेश्वर अभयारण्यातील बालयोगी सदानंद महाराज आश्रमाच्या भक्तनिवासाची इमारत पाडल्यानंतर आता बाबांचा आश्रम देखील तोडतील असे संदेश सदानंद बाबांचे जन्मगाव असलेल्या भार्इंदरच्या राई सह मोर्वा, मुर्धा गावात पसरल्याने संतप्त भक्तांनी आज गुरुवारी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. दोन वेळा रास्ता रोको करण्यात आला. या मुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
सदानंद बाबा यांचा अभयारण्यातील आश्रमसह अन्य बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्या नंतर कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आश्रम व परिसरात ठेवण्यात आला आहे. कारवाई दरम्यान अन्य ठिकाणी भक्तांचा उद्रेक होण्याच्या शक्यतेने मीरा भार्इंदर मधील मोर्वा, राई, मुर्धा सह आगरी समाज बहुल गावां मध्ये बुधवार पासुन पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तुंगारेश्वर अभयारण्यातील भक्त निवासाची इमारत आश्रमाच्या ट्रस्टींनी स्वत:च तोडायला घेतली होती. पण आज गुरुवारी पोकलेनच्या सहाय्याने शासनाने ती जमीनदोस्त केली. भक्त निवासची इमारत तोडली आता आश्रमावर कधीही कारवाई होईल, वाट बघु नका त्वरीत तुंगारेश्वरला या अशा आशयाचे संदेश सोशल मिडीयावरुन व्हायरल होऊ लागले.
बाबांचे जन्मगाव असलेल्या राई गावात याचे त्वरीत पडसाद उमटले. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास राईगावातील महिला मोठ्या संख्येने मुख्य रस्त्यावर आल्या . महिलांनी रस्त्यातच ठाण मांडली. तरुण आदी देखील यात सहभागी झाले. भार्इंदर - उत्तन मार्गावरील दोन्ही बाजुची वाहनं रास्ता रोको मुळे अडकुन पडली. शाळांच्या बस मध्ये विद्यार्थ्यांसह महिला, प्रवाशी आदी वाहतुक कोंडीत अडकले.
भार्इंदर व उत्तन सागरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या बस मध्ये विद्यार्थी अडकले आहेत याची जाणीव करुन दिली. यावेळी भक्तांनी बाबांचा जयघोष करत घोषणा दिल्या. राई गावात भक्त रस्त्यावर उतरल्याचे कळताच पुढे असलेल्या मोर्वा गावातील भक्तगण देखील रस्त्यावर उतरले. रास्ता रोको मुळे दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासा भराच्या रास्ता रोको नंतर पोलीसांनी आंदोलकांना बाजुला घेत रस्ता मोकळा केला.
परंतु त्या नंतर रात्री पुन्हा भक्त महिलांसह पुरुषांनी रस्त्यावर बसत आरती म्हणायला सुरवात केली. त्यामुळे पुन्हा वाहतुक ठप्प झाली. अखेर पोलीसांनी पुन्हा समजुत काढल्या नंतर भक्तांनी रस्ता मोकळा करुन दिला. रात्री गावात आश्रमा बाबत बैठक घेण्यात आली. दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने आश्रमा बाबत काय निर्णय होतोय या कडे भक्तांचे लक्ष लागुन आहे.