ठाण्यातील विसर्जनस्थळी, गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रांवर भाविकांनी घेतली ‘हरित शपथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:40 AM2021-09-13T04:40:06+5:302021-09-13T04:40:06+5:30
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या सर्व विसर्जन महाघाट, कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्ती स्वीकृती ...
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या सर्व विसर्जन महाघाट, कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रांवर शनिवारी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे रक्षण करण्यासाठी हरित शपथ घेण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी माझी वसुंधरा या उपक्रमात सहभागी होऊन ठाणे शहराचा राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
राज्य शासनाद्वारे राबविलेल्या माझी वसुंधरा अभियान २०२०-२१ मध्ये महापालिकेने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यावर्षाकरिताही या स्पर्धेची घोषणा झालेली असून ‘माझी वसुंधरा २’ मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विसर्जन स्थळांवर, गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रांवर पंचतत्त्वांचे रक्षण करण्याबाबतची हरित शपथ भाविकांकडून घेण्यात आली आहे.