डीजी सिटीच्या ठेकेदारावर साडेअकरा कोटींची मेहरबानी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:27 AM2020-01-09T01:27:09+5:302020-01-09T01:27:19+5:30
ठाणे महापालिकेचे डीजी सिटी अॅप पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
अजित मांडके
ठाणे : ठाणे महापालिकेचे डीजी सिटी अॅप पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये त्याचे ठेकेदार ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ यांची मुदत संपुष्टात येणार होती. मात्र, त्याआधीच नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्याला पुन्हा पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.
विशेष म्हणजे पहिल्या वर्षात पाच लाख वर्गणीदारांचे टार्गेट असताना आणि दुसऱ्या वर्षातही संबंधित ठेकेदार लक्ष्यापर्यंत पोहोचला नसताना दोन वर्षांसाठी ११ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावाला काही सदस्यांचा विरोध असतानाही मंजुरी दिली आहे. यामुळे या कंत्राटातील ‘बेरी’ खाणारे ‘कोल्हे’ कोण याच्या शोधासाठी या ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’च्या कंत्राटाची चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिकेच्या डीजी सिटी अॅपचा शुभारंभ २३ जानेवारी २०१८ रोजी मोठ्या जोशात केला होता. पहिल्या सहा महिन्यांतच पाच लाखांचे उद्दिष्ट गाठावे, असे निश्चित झाले होते. परंतु, पहिल्या सहा महिन्यांत केवळ ४२ हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले. त्यातही त्याद्वारे मालमत्ताकर भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाईल, असे पालिकेने जाहीर केले होते. परंतु, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नसतानासुद्धा संबधित‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ला पालिकेने कालावधी संपण्यापूर्वीच ११ कोटींचे बिल अदा केले होते. त्यामुळे हा वाद चांगलाच उफाळून आला होता.
>काम पूर्ण नसताना ११ कोटींचे बिल
देशातील पहिला प्रकल्प म्हणून येत्या १० जानेवारी रोजी डीजी सिटीचा सन्मान करण्यात येणार आहे. असे जरी असले तरी आता पुन्हा हे अॅप वादात सापडण्याची चिन्हे आहेत. आधीच काम पूर्ण केले नसताना ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ला ११ कोटींचे बिल अदा केल्याचा वाद पेटला होता. त्यानंतर, आता पुन्हा काही दिवसांपूर्वी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्यांना पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव आयत्या वेळी मंजूर केला आहे. मुळात ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ला दिलेला कालावधी हा येत्या आॅगस्टमध्ये संपणार होता. परंतु, सहा ते सात महिने आधीच त्यांना ११.५२ कोटीच्या कंत्राटाची ची मुदतवाढ का दिली, असा सवाल करण्यात येत आहे.
>शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही प्रस्तावांची मुदतवाढ संपून सहा महिने ते एक वर्ष होते, सुरक्षारक्षकांच्याही मुदतवाढीचा प्रस्ताव हा मुदत संपल्यानंतरही तीन ते चार महिन्यांनी पालिका मंजुरीसाठी आणत असते. असे असतानाही महत्त्वाच्या किंबहुना अत्यावश्यक असलेल्या कामांना मुदतवाढ न देता डीजी सिटीसाठी एवढी लगीनघाई कशासाठी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
>अवघ्या दोन लाख ठाणेकरांनीच
केली नोंदणी
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास असताना आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार लोकांनी या अॅपचा फायदा घेतल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर, ६५० व्यापाऱ्यांनी यासाठी नोंदणी केली असून त्यानुसार एक हजाराहून अधिकच्या डिस्काउंट स्कीम या अॅपवर नोंदणी करणाºयांना मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे अॅप सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत किमान पाच लाखांच्या आसपास नागरिकांनी ते डाउनलोड करणे अपेक्षित होते. परंतु, तसे काही झालेले नसून आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले आहे.