ढाबे दणाणले!

By admin | Published: July 4, 2017 06:54 AM2017-07-04T06:54:38+5:302017-07-04T06:54:38+5:30

सर्वोच्च न्यायालयाचा दारूविक्रीचा निर्णय धाब्यावर बसवून बेकायदा दारूविक्री करणाऱ्या ढाब्यांबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये

Dhabale! | ढाबे दणाणले!

ढाबे दणाणले!

Next

पंकज पाटील/लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : सर्वोच्च न्यायालयाचा दारूविक्रीचा निर्णय धाब्यावर बसवून बेकायदा दारूविक्री करणाऱ्या ढाब्यांबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच काटईनाका ते वांगणी परिसरापर्यंत एकच खळबळ उडाली. उत्पादन शुल्क विभागाने तातडीने धाब्यांवर कारवाई सुरू केली. त्यांच्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या दारूविक्रीला अभय दिले होते, त्यांनी तातडीने या कारवाईची माहिती देत दारू नष्ट करण्याचे आदेश दिले. आठ ढाब्यांवर कारवाई होताच त्यातील तीन ढाब्यांचे मालक फरार झाले.
अंबरनाथ तालुक्यातील राज्य महामार्गावर बार बंद असले, तरी त्याच रस्त्यावरील ढाब्यांवर मात्र दारू विकण्याचा बेकायदा व्यवसाय फोफावला होता. त्याचे स्टिंग आॅपरेशन करून ‘लोकमत’ने ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’अंतर्गत त्याचा तपशील प्रसिद्ध करताच एकच खळबळ उडाली. ढाबेमालक, त्यांना आशीर्वाद देणारे पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, दारू पुरवठादार यांनी तातडीने दारू नष्ट करण्यास सुरूवात केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्हा अधिक्षक एन. एन. पाटील यांच्या पथकाने या ढाब्यांवर कारवाई सुरू केली. त्यात आणखी अनेक ढाब्यांवर सर्व नियम धाब्यावर बसवून दारूविक्री होत असल्याचे उघड झाले. एवढ्या मोट्या प्रमाणात दारूविक्री होत असूनही स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही विक्री राजरोस वाढतच गेली. त्यांचे बिंग ‘लोकमत’ने फोडताच पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली. स्थानिक कर्मचाऱ्यांना माहिती न देता ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांनी आपल्या पथकासह या हायवेवर मोठी कारवाई केली. त्यात तळोजा फाटा येथील बबलू ढाबा, वसार येथील चड्डी ढाबा, माधुरी ढाबा, फॉरेस्ट नाका येथील कमलेश ढाबा, हेदुटणे येथील गावदेवी ढाबा, काटईनाका येथील एकविरा ढाबा, खोणी येथील खोणी ढाबा, बदलापूर येथील साईदीप ढाब्यावर छापे टाकण्यात आले. त्यात आठ ढाबेचालकांना अटक करण्यात आली, तर तीन ढाब्यांचे मालक फरार झाले आहेत. या कारवाईत २२ देशी दारू च्या बाटल्या, ५६ विदेशी दारूच्या बाटल्या, १२६ बियर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतरही ढाब्यांवर कारवाई झाली. पण सोमवार असल्याने तेथे दारू पिणारे कोणीच नव्हते. त्यामुळेही काही ढाबा मालक बचावले. मात्र येत्या तीन-चार दिवसात उरलेल्या ढाब्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

‘लोकमत’च्या वृत्तानंतर लागलीच कारवाई करण्यात आली. मनुष्यबळ कमी असले, तरीही ही कारवाई करण्यात आली. येता आठवडाभर अशी कारवाई केली जाईल. त्यानंतरही ढाब्यांवर दारू विकली जात असल्याची तक्रार आल्यास त्या ढाब्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
- एन. एन. पाटील, अधीक्षक, ठाणे जिल्हा राज्य उत्पादन
शुल्क विभाग

उत्पादन शुल्कच्या कारवाईपूर्वीच ‘लोकमत’चे वृत्त वाचून ढाबेमालक आधीच धास्तावले. त्यांनी तातडीने दारू नष्ट करण्यास सुरूवात केली आणि इतर ढाबेमालकांना या वृत्ताची माहिती पुरवत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. ज्यांना कल्पना नव्हती, त्यांना काही पोलिसांनीच माहिती पुरवत काळजी घेण्यास सांगितले.

Web Title: Dhabale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.