धनाजी तोरसकर यांनी थकविले १४ लाखांचे घरभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:59 AM2019-07-27T00:59:35+5:302019-07-27T00:59:41+5:30

बांधकाम विभागाचे पत्र : मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Dhanaji Toraskar fatigued 2 lakhs of houses | धनाजी तोरसकर यांनी थकविले १४ लाखांचे घरभाडे

धनाजी तोरसकर यांनी थकविले १४ लाखांचे घरभाडे

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर हे महापालिका प्रशासनाला न सांगता दोन महिन्यांपासून गैरहजर आहेत. मात्र, ते मुंबईत सरकारी घरात राहत असून, त्यांनी या घराचे १४ लाख ६९ हजार रुपयांचे घरभाडे थकविले आहे. हे भाडे त्यांनी भरलेले नसल्याने ही रक्कम त्यांच्या पगारातून वळती केली जाणार आहे.

राज्य सरकारने २०१५ पासून तोरसकर यांना केडीएमसीत प्रतिनियुक्तीवर पाठविले. केडीएमसीतील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदाचा पदभार त्यांना देण्यात आला. मात्र, लोकसभा निवडणूक झाल्यापासून तोरसकर हे महापालिकेत आलेले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचे कारण त्यांनी महापालिका आयुक्तांना कळविलेले नाही. परंतु, ते मुंबईतील हाजीअली येथील सरकारी निवासस्थानात राहत आहेत. या घराचे मे २०१५ ते जून २०१९ या ४८ महिन्यांचे भाडे त्यांनी भरलेले नाही. या घरभाड्याची रक्कम १४ लाख ६९ हजार रुपये इतकी असून, त्यांनी ती न भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्या रूपाली पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना ही बाब कळवली आहे. ही बाब गंभीर असल्याने महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी का.बा. गर्जे यांनी तोरसकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी त्यांचे थकीत घरभाडे सार्वजनिक बांधकाम विभागास भरावे. अन्यथा, त्यांच्या पगारातूनही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास थकीत घरभाड्यापोटी वळती केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

तोरसकर हे न सांगता गैरहजर असल्याने त्याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. तोरसकर यांच्याकडील पदभार अमित पंडित यांच्याकडे दिला होता. मात्र, पंडित यांची मुरूड-जंजिरा येथे बदली झाल्याने त्यांना ३१ जुलैला कार्यमुक्त केले जाणार आहे.

दुसरीकडे केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार हे देखील गैरहजर आहेत. पगार यांनीही त्याची कुठे बदली झाली का, हे देखील महापालिका प्रशासनास कळविलेले नाही. त्यांचा कारभार खोडके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडल्याने ते पद रिक्त आहे. त्यामुळे आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार सुरेश पवार यांच्याकडे दिला आहे. ते देखील या महिनाअखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सध्या महापालिकेत खोडके आणि पवार हे दोन उपायुक्त आहेत. पवार निवृत्त झाल्यावर सगळा पदभार खोडके यांच्याकडे येणार आहे. पवार यांना आणखी दोन वर्षे सेवा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Dhanaji Toraskar fatigued 2 lakhs of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.