धनंजय कुलकर्णी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:31 AM2019-01-23T00:31:31+5:302019-01-23T00:31:34+5:30
डोंबिवली पूर्वेचा भाजपा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. दरम्यान, कुलकर्णीच्या जामिनासाठी त्याच्या वकीलाने केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कल्याण : बंदी असलेल्या शस्त्रांची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता तथा डोंबिवली पूर्वेचा भाजपा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. दरम्यान, कुलकर्णीच्या जामिनासाठी त्याच्या वकीलाने केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मानपाडा रोड परिसरात असलेल्या महावीर नगरातील अरिहंत इमारतीमध्ये ‘तपस्या हाऊस आॅफ फॅशन’ या दुकानात बंदी आणलेल्या शस्त्रांचा साठा बाळगणाऱ्या कुलकर्णीला कल्याण गुन्हे शाखेने १४ जानेवारी रोजी अटक केली. कुलकर्णी आधी न्यायालयीन कोठडीत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास होऊ शकला नसल्याचे कारण देत तपास अधिकाºयांनी त्याची पोलीस कोठडी मागितली. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
>पोलिसांची लपवाछपवी आणि पळवापळवी
मंगळवारी कल्याण न्यायालयात आणण्यात आलेल्या कुलकर्णीला पत्रकारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी कल्याण न्यायालयात उपस्थित असलेल्या पत्रकारांची दिशाभूल करुन पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पोलिसांनी कुलकर्णीला अक्षरश: पळवत नेत गाडीत बसवले. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी पळवापळवीचे हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले.