उल्हासनगर इमारत दुर्घटनेत धनवानी कुटुंब उद्ध्वस्त, मुलीच्या लग्नाची तयारी होती सुरू तितक्यात...
By सदानंद नाईक | Published: September 22, 2022 07:09 PM2022-09-22T19:09:33+5:302022-09-22T19:10:29+5:30
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून १५ दिवसाच्या अंतरात ३ इमारतीचे स्लॅब कोसळून एकून ६ जणांचा बळी गेला.
उल्हासनगर - शहरातील मानस इमारतीचा स्लॅब कोसळून अख्या धनवानी कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगी प्रिया हिचा साखरपुडा होऊन, लग्नाची धामधूम घरात जोरात सुरू होती. तर तळमजल्यावरील पिठाची गिरणी चालविणारे अशोक घटनेच्या पाच मिनिटापूर्वी गोशाळेत गेल्याने ते वाचले. मात्र मुलगा सागर ओचानी यांचा मृत्यू झाला.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून १५ दिवसाच्या अंतरात ३ इमारतीचे स्लॅब कोसळून एकून ६ जणांचा बळी गेला. याप्रकारने धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासनाने धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत परिपत्रक काढावे. अशी मागणी होत आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले होते. कॅम्प नं-५ वसंतबहार परिसरात मानस नावाची ५ मजली धोकादायक इमारत असून अनेक प्लॉटधारक इमारत सोडून गेले आहेत. दुपारी चौथ्या मजल्याच्या स्लॅब थेट तळमजल्यावर पडला. चौथा, तिसरा व दुसरा खाली होता. तर पहिल्या मजल्यावर ढोलमदास धनवानी हे पत्नी रेणू व मुलगी प्रिया सोबत राहतात. ढोलमदास पती-पत्नी हे दोघेही गुंगे-बहिरे असून २५ वर्षीय मुलगी प्रिया हिचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. घरात लग्नाचे वातावरण असताना कुटुंबावर घाला येऊन, तिघा जणांचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इमारतीच्या तळमजल्यावर ओचानी यांची पीठ गिरणी व अन्नधान्याचा साठा विक्रीस ठेवला होता. अशोक ओचानी हे दुपारी २ वाजता शेजारील गोशाळेत गेले. तर २२ वर्षीय सागर नावाचा मुलगा पीठ गिरणीत थांबला होता. त्याच वेळी इमारतीचा स्लॅब कोसळून सागर याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने गोशाळेत गेल्याने अशोक ओचानी यांचा जीव वाचला. मात्र मुलाचा मृत्यू झाल्याने, ओचानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. इमारतीला खाली करण्याची नोटीस प्रभाग समितीने दिली होती. मात्र त्याच वेळी इमारत खाली केली असतीतर चौघांचे जीव वाचले असते. असे स्थानिक नागरिक बोलत आहेत.
धोकादायक इमारती बाबत बैठक
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव यांच्यासह नगररचनाकार, प्रभाग अधिकारी, अभियंते, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आदींची बैठक घेतली. इमारत स्ट्रक्चर ऑडिट बाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.