धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश

By अजित मांडके | Published: July 3, 2024 06:29 PM2024-07-03T18:29:54+5:302024-07-03T18:30:53+5:30

मंगळवारी आयुक्त राव यांनी बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली.

Dharamveer Anand Dighe swimming pool should be opened for citizens by 'this' date, Commissioner's instructions | धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून बाळकूम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे ही १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करुन तरणतलाव १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी झालेल्या पाहणीऱ्यादरम्यान दिले.

मंगळवारी आयुक्त राव यांनी बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली. बाळकूम, कोलशेत आदी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. सदर तरणतलाव अद्याप नागरिकांसाठी खुला झाला नसल्याने तो लवकर खुला करावी अशी मागणी सातत्याने परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या तरणतलावाची पाहणी करुन कामाचा आढावा घेत या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळमजला अधिक चार मजल्याची ही इमारत असून इमारतीच्या लिफ्टचे काम हे सप्टेंबरपर्यत पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात आले. परंतु तत्पूर्वी तरणतलावाची सर्व कामे पूर्ण करुन सदर तरणतलाव १५ ऑगस्ट रोजी नागरिकांसाठी खुला करावा असेही आयुक्तांनी नमूद केले. 

या ठिकाणी लहान मुलांसाठी बेबी पूलची मागणीही नागरिकांकडून होत असल्याचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आवश्यक बदल करुन मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.
ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियमची पाहणी ही आयुक्तांनी केली. या स्टेडियमध्ये असलेल्या बॅडमिंटन कोर्टच्या छताचे वॉटरप्रुफींगचे काम तातडीने करण्यात यावे., तसेच इमारतीला लावण्यात आलेल्या टाईल्स या उखडलेल्या अवस्थेत असून त्याची दुरुस्ती करावी, तसेच ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणची दुरूस्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय आदींची देखील पाहणी करण्यात आली.
  
घोडबंदर परिसरातील कलरकेम येथे महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडाची पाहणीही यावेळी करण्यात आली. घोडबंदर परिसरात नागरिकांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नसून याबाबत नागरिक वारंवार मागणी करत असल्याचे माजी नगरसेविका उषा भोईर यांनी नमूद केले. या सुविधा भूखंडावर क्रिकेटचे मैदान तयार केल्यास याचा फायदा परिसरातील मुलांना निश्चितच होईल. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करुन निर्णय घेवू असे आयुक्तांनी नमूद केले. तसेच बाळकूम येथे असलेल्या कलाभवनची पाहणी आपण केली असून कलाभवन दुरूस्ती करुन ते लवकरच कलाप्रेमींसाठी खुले होईल या दृष्टीने कार्यवाही करणार असल्याचेही राव यांनी नमूद केले.

Web Title: Dharamveer Anand Dighe swimming pool should be opened for citizens by 'this' date, Commissioner's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे