Dharmveer: 'धर्मवीर' आनंद दिघेंवरील चित्रपट पाहताना तांत्रिक बिघाड, प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:41 PM2022-05-15T23:41:50+5:302022-05-15T23:42:43+5:30
एक हजार ५० प्रेक्षकांच्या तिकीटाची रोकड परत करण्याची नामूष्की: नौपाडा पोलिसांसह शिवसैनिकांनी वातावरण केले शांत
ठाणे: ठाण्यात सध्या शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेला धर्मवीर हा चित्रपट रविवारी रात्री मल्हार सिनेमागृहातील ध्वनीक्षेपकांतील बिघाडामुळे बंद करावा लागला. चित्रपट अचानक बंद झाल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नौपाडा पोलीस आणि शिवसैनिकांनी प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्याचवेळी एक हजार ५० प्रेक्षकांच्या तिकीटाचे पैसेही परत केल्यामुळे रात्री ११ नंतर वातावरण शांत झाले.
आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेला रात्री ९.३० ते १२.३० च्या दरम्यानचा शो मल्हार सिनेमागृहात सुरु होता. एका प्रसंगाच्या वेळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास फक्त व्हिडिओ सुरु होता. पण ध्वनीक्षेपकांमधील तांत्रिक बिघाडामुळे आवाज येणे बंद झाले. थोडावेळ हा बिघाड सुरु राहील, असे मल्हारच्या व्यवस्थापनाला वाटले. परंतू, आवाज सुरुच न झाल्याने प्रेक्षकांमधूनही गोंधळ सुरु झाला. चित्रपटगृहातील प्रेक्षक बाहेर आल्याने हा गोंधळ बाहेरही सुरु झाला. अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करीत आरडाओरडा केला. अखेर नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी पोलिसांची कुमक बोलावून प्रेक्षकांना शात राहण्याचे आवाहन केले. स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख भगवान दिवाळे यांनीही प्रेक्षकांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला. तर दिघे यांच्यावरील चित्रपट असल्यामुळे कोणीही गालभोट लावू नका असे आवाहन नौपाडा पोलिसांनी केले. अखेर व्यवस्थापक दिवाळे यांनी दिलगिरी व्यक्त करीत सर्वच एक हजार ५० प्रेक्षकांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. साधारण रात्री ११.१५ वाजेपर्यंत प्रेक्षकांना पैसे परत करण्यात आले. त्यानंतर वातावरण पूर्णपणे निवळले. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वळतकर यांनी ‘लोकमत’ला दिली.