डोंबिवलीतील फडके रोडवर झाला ढोल-ताशाचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:45 AM2018-11-07T03:45:51+5:302018-11-07T03:46:24+5:30
फटाके फोडण्याची विशिष्ट वेळ न्यायालयाने ठरवून दिल्याने मंगळवारी डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी फटाक्यांच्या नव्हे तर ढोल ताशांच्या गजरात सुरु झाली. विविध ढोल ताशा पथके या दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाली होती.
डोंबिवली - फटाके फोडण्याची विशिष्ट वेळ न्यायालयाने ठरवून दिल्याने मंगळवारी डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी फटाक्यांच्या नव्हे तर ढोल ताशांच्या गजरात सुरु झाली. विविध ढोल ताशा पथके या दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाली होती. सळसळत्या उत्साहाची तरुणाई ढोल-ताशाच्या गजरात थिरकताना पाहावयास मिळाली.
डोंबिवलीत दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे सेलिब्रेशन खऱ्या अर्थाने पाहायला मिळते ते फडके रोडवर. फटाके फोडण्यावर निर्बंध आल्याने दिवाळीचा जल्लोष करण्याकरिता यंदा ढोल ताशाला पसंती दिली होती. ‘गर्जना’, ‘संस्कृती’, ‘श्रीमंत’, ‘स्नेहांकित’ , ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ , ‘महाकाल झांजपथक’ आणि ‘स्वर ब्रह्मांड युवा’ आदी ढोल-ताशा पथकांच्या वादनाने फडके रोड दुमदुमला. तडतडणारा ताशा, झांजचा झनकार आणि मोठा ठोका पडल्याने ढमढम वाजणारा ढोल यांनी आसमंत भरुन गेला. कदाचित फटाक्यांनी होणार नाही त्यापेक्षा जास्त आवाज या पथकांच्या सादरीकरणामुळे होत होता. ढोल ताशा पथकातील वादक शिस्तीने सादरीकरण करीत होते. त्यामुळे दिवाळी पहाटेच्या मंगलमय वातावरणात तरुणाई चक्क थिरकली.
सकाळी सहा वाजल्यापासून फडके रोडवर दिवाळी पहाटेची लगबग सुरु झाली. डोंबिवलीचे ग्रामदैवत गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन दिवाळी साजरी करण्याची डोंबिवलीकरांची प्रथा आहे. ज्येष्ठ मंडळी सकाळीच मंदिर परिसरात दर्शनासाठी जमा झाली होती. तरुणाई पारंपारिक वेश परिधान ग्रुुपने फिरत होती. सेल्फी काढत होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हॉटेल अथवा इंटिंग जॉईंटसवर गर्दी करुन गरमागरम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. तरुण-तरुणी एकमेकांना भेटून, हस्तांदोलन करुन अथवा अलिंगन देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. आठ वाजल्यानंतर फडके रोड गर्दीने फुलून गेला.
बहुतांश तरुणी साड्या नेसून आल्या होत्या. काहींनी तर नऊवारी साडी परिधान करुन नाकात नथ घातली होती. तरुणांनी सलवार-कुर्ते परिधान केले होते. काहींनी फेटेही बांधले होते. काही हौशी तरुणांनी धोतर, सफेद गांधी टोप्या, उपरणी असा ग्रामीण ढंगाचा पेहराव केला होता.
फडके रोडवरील माहौल मराठमोळा दिसून येत होता. काही तरुणांनी नव्या फॅशन ट्रेंडचे ड्रेस परिधान केले होते. चनिया चोली परिधान केलेल्या तरुणींचीही संख्या लक्षणीय होती. तरुण व तरुणींचे ग्रुप तसेच काही व्यक्ती अखंड आपले सेल्फी काढण्यात मग्न होते.
रस्त्यात मध्येच उभे राहून ग्रुप व व्यक्ती सेल्फी काढत असल्याने मागून येणाºयांना थांबावे लागत होते. जणू वेगवेगळ््या ग्रुपमध्ये सेल्फी घेण्याची चढाओढ लागली होती. काही हौशी मंडळींनी कॅमेरे आणले होते. फडके रोडवरील जल्लोष ते टिपत होते. बहुतांश ग्रुप हे फोटो स्टुडिओत जाऊन फोटो काढत असल्याने फोटो स्टुडिओबाहेर सकाळपासून गर्दी दिसत होती.
संस्कार भारतीने भव्य रांगोळी काढून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी पहाट निमित्त फडके रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. मात्र फडके रोडवर गर्दी असल्याने वाहतूक अन्यत्र वळवल्याने इंदिरा गांधी चौक, सर्वेश सभागृह चौकात वाहतूक कोंडी पाहावयास मिळाली.
सेल्फी स्पर्धेत आजी अव्वल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या रत्नप्रभा म्हात्रे आणि युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव अमित म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाटमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत दोन वर्षाची स्वर गावंडे आणि ६६ वर्षाच्या वर्षा चौधरी यांनी काढलेल्या सेल्फीला पारितोषिक देण्यात आले.
एक सोसायटी एक रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक शास्त्रीनगर परिसरातील शिवा आकांक्षा सोसायटी, दुसरा क्रमांक पॅनोरम सोसायटी, तिसरा क्रमांक तुळशीराम जोशी चाळीला देण्यात आला. या वेळी काही अंध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
अमित मराठी कलाकारांचा वाद्यवृंद कार्यक्रमही पार पडला. म्हात्रे यांनी अंध व्यक्तीबरोबर सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढला. या वेळी तरुणाईने गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी हजेरी लावली होती.
‘ब्रदरहूड’चे वेगळेपण...
‘ब्रदरहूड’ नावाचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे. त्यांनी एकसारखा पेहराव केला होता. त्यामुळे इतर ग्रुपपेक्षा त्यांचा ग्रुप उठून दिसत होता. दरवर्षी हा ग्रुप एकसारखा पोषाख परिधान करुन युनिटीचा संदेश देत असल्याची माहिती ग्रुपच्या प्रमुख आर्या पाटील यांनी दिली. अन्य ग्रुपही त्यांचे अनुकरण करीत आहेत.