ठाणेकरांची कौटुंबिक जबाबदारी राखत धूळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:08+5:302021-03-30T04:24:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे - यंदा पाण्याचे फुगे नाहीत, सोसायटीच्या आवारात किंवा टेरेसवर फारशी धूळवड नाही. रस्त्यांवर, नाक्यांवर तरुणांचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - यंदा पाण्याचे फुगे नाहीत, सोसायटीच्या आवारात किंवा टेरेसवर फारशी धूळवड नाही. रस्त्यांवर, नाक्यांवर तरुणांचे जथ्थे नाहीत. खूप मोठ्या प्रमाणात बाइक रायडर्सही नाही, असे बऱ्यापैकी शांत वातावरण सोमवारी धूलिवंदनाच्या दिवशी पाहायला मिळाले, ते ठाणे शहरात. त्याला कारण होते ते कोरोनाचे. यंदाच्या धूळवडीवर कोरोनाचे सावट आणि त्यातच शासनाचे कडक निर्बंध होते. त्यामुळे ठाणेकरांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारीचे भान राखत रस्त्यावर न उतरता घरातच राहून आणि कुटुंबातील एकमेकांना केवळ रंगांचा एखादा टिळा लावून धूळवडीचा आनंद लुटला. तर, काही सोसायट्यांत लहान मुले अगदी आपापल्या मजल्यावर सुक्या रंगांची होळी खेळताना दिसून आले.
होळी आणि धूलिवंदन सणांचा उत्साह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये असतो. गेल्या काही वर्षांत ठाणेकरांनी सामाजिक भान राखत पाण्याचा वापर कमी केला आणि रासायनिक रंगांचा वापरही टाळला आहे. यंदा मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत या ठाणेकरांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारीचे भान राखत धूळवड साजरी केली. घराबाहेर, सोसायटीत, नाक्यावर मित्रमैत्रिणींना न भेटता घरीच थांबणे पसंत केले. घरातील चिमुरड्यांच्या जोडीने कुटुंबातील एकमेकांना रंगाचा एखादा टिळा किंवा गालावर थोडासा रंग लावला. लहान मुले होळी खेळण्यास उत्सुक होती. मात्र, त्यांनाही पालकांनी कोरोनाच्या भीतीने आपापल्या घरासमोरून दूर होऊ दिले नाही. आपल्याच राहत्या मजल्यावर किंवा गल्लीतच खेळताना ही मुले दिसत होती. तसेच शासनाच्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचेही निर्देश होते. अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे अगदी दुपारपर्यंत रस्त्यावर दिसणारी, पादचाऱ्यांना किंवा कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांवर पाण्याचे, रंगांचे फुगे टाकून त्यांना त्रास देणारी मंडळीही फारशी दिसली नाहीत. तर, शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनेक दुकाने सोमवार सकाळपासूनच बंद होती. शहरात होळी-धूळवडीचा उत्साह नसला, तरी शिमगोत्सवासाठी होळीच्या एक दिवस आधीच अनेक ठाणेकर कोकणातील आपल्या मूळ गावी जाण्यास निघाले होते.
तर, रविवारी होलिकादहनाचा छोटेखानी कार्यक्रम मात्र ठाण्यातील काही भागांत मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यात्या भागातील स्थानिकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. तसेच ‘यंदा तरी या कोरोनारूपी राक्षसाचे दहन होऊ दे आणि पुढील वर्षी उत्साहात, मोकळेपणाने होळी साजरी करता येऊ दे’, अशी प्रार्थना केली.