अवघ्या दोन तासांत होणार क्षयरोगाचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:52 PM2019-11-06T23:52:54+5:302019-11-06T23:53:16+5:30
विनामूल्य चाचणी : अत्याधुनिक सीबीनॅट कार्यान्वित
ठाणे : क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाकरिता त्याचे अचूक व त्वरित निदान होण्यासाठी ठाणे महानगरपालिका व इंडियन आॅइल यांच्या सहकार्याने सी.आर. वाडिया हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सीबीनॅट मशीन मंगळवारी कार्यान्वित करण्यात आली. यावेळी क्षयरोगावर मात करत शालान्त परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरु द्ध माळगावकर, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, क्षयरोग अधिकारी खुशबू टावरी, इंडियन आॅइलचे महाप्रबंधक (सीएसआर) सुबीर श्रीवास्तव, वरिष्ठ प्रबंधक सौम्या आनंद बाबू, वाडिया हॉस्पिटलचे डॉ. कृष्णमूर्ती, डॉ. श्रीमती सोनावणे, डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. ज्योती साळवे आदी उपस्थित होते.
सीबीनॅट मशीनमुळे क्षयरोगाचे निदान अवघ्या दोन तासांत होणार आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये २५00 ते ३000 रु पये इतका खर्च असणारी ही चाचणी वाडिया हॉस्पिटलमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर ठाण्यातच ही मशीन कार्यान्वित करण्यात आली असून या मशीनवर एकावेळी ८ रूग्णांच्या क्षयरोगाची चाचणी करता येऊ शकते. खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णांची चाचणीदेखील येथे मोफत करण्यात येणार असून जास्तीतजास्त रूग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्षयरोगाचे वेगवान निदान करण्याकरिता सीबीनॅट उपयुक्त ठरणार आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी पूर्ण कालावधीसाठी (सहा महिने किंवा अधिक) उपचार घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्वरित उपचार चालू केल्यास रूग्णासाठी फायद्याचे असून त्याच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यताही कमी होते.
यशवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
क्षयरोगाची लागण होऊनदेखील इयत्ता दहावी, बारावी शालान्त परीक्षेत यश मिळवलेल्या ठाणे महापालिका परिसरातील विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गंभीर आजारावर मात करत वेळेवर औषधोपचार घेऊन हे यश संपादन केले आहे.