सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 03:50 AM2018-09-18T03:50:51+5:302018-09-18T06:47:29+5:30
गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवल्याची खंत; बालपणापासून ते अभिनय, दिग्दर्शनापर्यंतचा उलगडला प्रवास
कल्याण : पूर्वी कलाकार आणि रसिकांमध्ये संवाद असायचा. अलिकडच्या काळात हा संवाद मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सेल्फीच्या नादात दोघांमधील संवाद हरवला जात असताना, सुभेदारवाडा गणेशोत्सवात सेल्फीचा अट्टाहास अनुभवास आला नसल्याचे प्रतिपादन अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा दुर्वांकुर मंडळातर्फे सुबोध भावे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात अनुश्री फडणीस यांनी भावे यांची मुलाखत घेतली. बालपणापासून ते अभिनय दिग्दशनापर्यंतचा प्रवास भावे यांनी यावेळी कथन केला. मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले गेले. मुलाखतीदरम्यान भावे म्हणाले, जेव्हापासून मोबाईलमध्ये कॅमेरा आलाय, तेव्हापासून आमच्या कलाकारांच्या डोक्याचा ताण वाढलाय. कुठे सेल्फी घ्यावी, याचेही भान कुणाला राहीलेले नाही. मोबाईल कॅमेरे नव्हते, तेव्हा प्रेक्षकांचा कलावंतांशी संवाद असायचा. तो संवाद म्हणजे जिवंतपणाचे लक्षण होते. सेल्फीच्या जमान्यात हा संवादच हरवलाय. तो कृपया हरवून देऊ नका, असे आवाहन भावे यांनी केले. उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपाविषयीही भावे यांनी भाष्य केले. विचारांचे आदान-प्रदान व्हावे. समाजात संवाद घडावा, या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.परंतू सध्याचा गणेशोत्सव मूळ हेतूपासून दूर जाऊ लागला आहे. विचारवंत आणि बुध्दीवंतांनी समाजातील घटक म्हणून याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अभिनयाच्या प्रवासाबाबत बोलताना ते म्हणाले, शालेय जीवनात स्नेहसंमेलनामधील नाटकात काम करायचो. तेव्हा मला नाटकाची फार आवड नव्हती; पण अशा संमेलनामध्ये हौशेपोटी काम करण्याचा एक वेगळा आनंद मिळायचा. महाविद्यालयातील युवा नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. एका नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. येथून अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणे यासारखा मनस्वी आनंद कशातच नसतो. तो मला मिळाला. परंतू सध्या सर्वत्र उलट स्थिती आहे. माणसाला जन्मल्यापासून मोक्ष कशात आहे, हेच शिकविले जाते. अडीअडचणी, संकटे, अपयश या गोष्टी मी मानत नाही. त्यामुळे आयुष्यात नापास होण्याची भिती बाळगत नाही, असे म्हणाले.
आमीर खाँ, अभिषेकींचा प्रभाव
जितेंद्र अभिषेकी, उस्ताद आमीर खाँ यांच्या गायकीने माझे आयुष्यच झपाटून टाकले. ते संगीताचे पुजारी होते. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या यशस्वी कलाकृतींमागे अभिनेता म्हणून केवळ माझे श्रेय नसून अभिषेकी आणि उत्साद खाँ यांच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे.