व्यक्तीपूजेमुळे देशाला हुकूमशाहीचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:07 AM2019-01-21T00:07:36+5:302019-01-21T00:07:43+5:30
मोदी सरकारने लोकशाही संस्थांची मोडतोड करायला सुरुवात केली आहे.
कल्याण : मोदी सरकारने लोकशाही संस्थांची मोडतोड करायला सुरुवात केली आहे. भारतीय राजकारणात व्यक्तिपूजेचे स्तोम माजत आहे. अन्य कोणत्याही देशांत ती इतकी दिसून येत नाही. व्यक्तिपूजेमुळे अध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा धोका निर्माण होतो. त्याचा प्रतिकार करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. संविधान टिकले तरच आपण टिकू, असे प्रतिपादन संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक व विचारवंत निरंजन पाटील यांनी रविवारी येथे केले.
शहराच्या पश्चिम भागातील वालधुनी, अशोकनगरमधील बुद्धभूमी फाउंडेशन येथे ‘प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी’तर्फे एकदिवसीय ‘संविधान साहित्य संमेलन’ रविवारी झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. प्रा. दामोदर मोरे, डी.एल. कांबळे, चंद्रशेखर भारती, एस.एन. भालेराव, सर्वेश्वर काणेकर, डॉ. सुषमा बसवंत, अण्णा रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केले.
पाटील म्हणाले की, राजकीय पक्षांनी पक्ष आणि जातीला अधिक महत्त्व दिले, तर लोकशाहीव्यवस्था धोक्यात येईल, असे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. सध्या आपला देश याच परिस्थितीतून चालला आहे. देशाची सत्ता संविधानाचे शत्रू असलेल्यांच्या हाती गेली आहे. त्यामुळे भारतात अदृश्य स्वरूपात आणीबाणीची स्थिती आहे. त्यासाठी संविधानाचे रक्षण केले पाहिजे. आपल्या देशात कोणी काय खावे, काय बोलू नये, काय लिहावे, काय लिहू नये, अशा प्रकारची अघोषित सेन्सॉरशिप लागू झाली आाहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती धोक्यात आली आहे. जे लिहितात, बोलतात, त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्यांना ठार मारले जात आहे. संविधान आणि देश वाचविण्यासाठी लेखकांनी जागे होऊन त्यावर आपल्या लेखणीने प्रहार केला पाहिजे. सरकारच्या विरोधात आपल्या लेखणीचे हत्यार उपसले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. संविधानाला आपण वाचविले नाही, तर आपल्याला कोणी वाचविणार नाही, याकडे पुन्हा एकदा पाटील यांनी लक्ष वेधले.
संमेलनाचे प्रास्ताविक डी.एल. कांबळे यांनी केले. ते म्हणाले की, सम्राट अशोक याने त्याच्या काळात सर्व प्रकारच्या प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर बंदी घातली होती. अशोक राजाच्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय होता. मात्र, स्वतंत्र भारतात ब्राह्मणी संस्कृतीला राजाश्रय मिळत असून बौद्ध संस्कृती परकी ठरली आहे. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, याकडे लक्ष वेधले. प्रा. मोरे यांनी सांगितले की, भंडारा जिल्ह्यात दरवर्षी संविधान संमेलन भरविले जाते. त्याच धर्तीवर कल्याणमध्ये पहिल्यांदाच संविधान संमेलन भरविले गेले, ही बाब कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे.
।उद्घाटन दीड तास उशिराने
या संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार होते. तसेच संमेलनास आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार होेते. हे दोन्ही मान्यवर न आल्याने संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष निरंजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने उद्घाटन झाले.