मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप
By धीरज परब | Published: June 25, 2024 08:29 PM2024-06-25T20:29:43+5:302024-06-25T20:31:09+5:30
Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
मीरारोड - सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. प्रत्यक्षात ३५ लाख रुपये एल एन्ड ती कंपनीने दिलेले आहेत . पण गाजावाजा मात्र मुख्यमंत्र्यांनी असा केला जणू ५० लाख त्यांनी स्वतःच्या खिशातून दिले आहेत असा टोला विचारे यांनी लगावला.
नायगावच्या हद्दीत वरसावे खाडी पुलाजवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे . शाफ्टच्या कामा दरम्यान पोकलेन चालक राकेशकुमार यादव हा २९ मे रोजी बाजूचे काँक्रीट ब्लॉक व माती कोसळून ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे . परंतु महिना झाला तरी यादव याचा शोध शासन आणि राज्य व केंद्रातील यंत्रणांना घेता आलेला नाही . कारण यादव हा गरीब चालक असल्याने त्याचा मृतदेह काढण्यास सरकार अनुत्सुक असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी घटनास्थळी भेट देऊन केला आहे.
सोमवारी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि माजी खा . विचारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन शोधकार्याची माहिती घेतली . यावेळी एम एम आर डी अभियंता कुणाल शेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , संपर्कप्रमुख नरेश मणेरा, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, माजी नगरसेवक प्रवीण पाटिल, उपशहर प्रमुख राजू ठाकुर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, संजय दळवी, अमोल हिंगे आदी उपस्थित होते.
राकेशकुमार यादव याचा अजून शोध लागला नसल्याने त्याच्या प्रतीक्षेत त्याची पत्नी व कुटुंबीय उघड्यावरच बसलेले होते त्यांची चतुर्वेदी व विचारे यांनी भेट घेतली . यावेळी यादव याच्या पत्नीने अश्रू अनावर होत आपली व्यथा मांडली . यादव याच्या कुटुंबीयांना थांबण्यासाठी निदान कंटेनरची व्यवस्था करा आणि शोधकार्यची गती वाढवा अशी मागणी एमएमआरडीए कडे केली .
यादव कुटुंबियांना ५० लाखांची मदत केल्याचा गाजावाजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवला असला तरी त्यातील केवळ ३५ लाखांचा धनादेश दिला असून तो देखील एल एन्ड टी कंपनीने केलेली मदत आहे . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिश्यातुन मदत केली आहे का ? हे सांगावे . तर विम्याचे १५ लाख रुपये अजून यादव कुटुंबियांना मिळणे बाकी असून ते त्यांना तात्काळ दिले जावे अशी मागणी विचारे यांनी केली .