प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची?; लोकप्रतिनिधी संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:46 AM2019-04-22T05:46:45+5:302019-04-22T05:47:58+5:30
निवडणुकीचा आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने वाढली डोकेदुखी
ठाणे : ऐरवी ढुंकुनही न पाहणारे राजकीय नेते निवडणूक जवळ आली की मतदारांच्या घराचे अक्षरश: उंबरे झिजवतात. त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात वाटेकरू होऊ पाहतात. कारण, तो त्यांचा हुकुमी जनसंपर्काचा एक भाग असतो. लग्न ही त्यातील एक महत्त्वाची घटना. विभागाचे नगरसेवक किंवा आमदारांनी लग्नाला हजेरी लावली की, त्या कुटुंबालाही समाधान वाटते. त्यामुळेच राजकीय नेते मतदारसंघातील लग्न सहसा चुकवत नाहीत. यंदा मात्र ऐन निवडणुकीच्या हंगामात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. निवडणुकीचा प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.
मुंबई-ठाणे परिसरांत येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहेत. त्याचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. त्यात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने राजकीय नेत्यांची पंचाईत होऊ लागली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका येणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताकरता विद्यमान आमदारांना आपल्या भवितव्याचीही काळजी आहे. लग्नसोहळा हा राजकीय नेत्यांना लोकांच्यात मिसळण्याची मोठी संधी असते. लोकप्रतिनिधी ती साधतात. एकाच दिवशी अनेक मुहूर्त असले, तरी त्यातील काहींना हळदी समारंभाला, काहींच्या लग्नाला तर काही ठिकाणी पूजेला हजेरी लावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतात. यंदा निवडणुकीच्या १० दिवस आधी जवळपास दररोज लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या लग्नकार्याच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तोंड द्यावे लागणार असल्याने विद्यमान आमदारसुद्धा या लग्नावळीला जातीने हजेरी लावताना दिसू लागले आहेत.
मतदानापर्यंत लग्नाचे ३१ मुहूर्त
सर्वसाधारणपणे शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, लग्नाचे मुहूर्त ठरवले जातात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मुहूर्त आहेत. निवडणूक काळात तर हे प्रमाण अधिक आहे. १९ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान लग्नाचे तब्बल ३१ मुहूर्त आहेत. २१ आणि २५ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज ते आहेत. त्यामुळे लगीनसराईत मतदार व्यस्त होणार असल्याने त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्याची कसरतही नेते मंडळींना करावी लागणार आहे.
धार्मिक कार्यक्रमांनाही भेटी
हनुमान जयंती आणि त्याच दिवशी आलेल्या गुड फ्रायडेच्या निमित्ताने ठाण्यातील उमेदवारांनी अनेक चर्चना भेटी दिल्या होत्या. तर, हनुमान जयंतीनिमित्ताने ज्याज्या ठिकाणी भंडारा ठेवला होता, त्यात्या ठिकाणी सुमारे एक ते दोन हजारांचा जमाव हजर असतो. अशा ठिकाणीही उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.