मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:13+5:302021-06-29T04:27:13+5:30

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : रस्ते अपघातात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांची संख्या ...

Died cheap; Epidemic Coronane, | मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने,

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने,

Next

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : रस्ते अपघातात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांची संख्या वाढत आहे. रस्ते अपघातात मृत्यू होणे ही वाहनधारकाची चूक असतेच; पण काही प्रसंगी याला तांत्रिक बाबीही कारणीभूत ठरतात. दुसरीकडे मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोरोनामुळेही अनेकांना आपला जीव गमवावा लागला असताना या कालावधीत बरेच महिने लॉकडाऊन, निर्बंध लागू असतानाही रस्ते अपघात सुरूच राहिले. त्यामुळे इथे मरणही झाले स्वस्त असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

विशेषकरून महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आढळते. हे चित्र आता शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही सर्रासपणे पाहायला मिळते. यात दुचाकी, चारचाकी व मालवाहू व अवजड वाहनांचा समावेश आहे. दारू पिऊन वाहने चालविणे, अधिक वेळ ड्रायव्हिंग करणे, जलद वेगाने वाहने पळविणे, वळणाच्या ठिकाणी ओव्हरटेक करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे ही कारणे अपघातासाठी प्रमुख ठरतात. वाढत्या शहरीकरणात वाहनांची संख्याही अधिक वाढली आहे. कल्याण परिमंडळ ३ परिक्षेत्रात २०१८ पासून ते मे २०२१ पर्यंत ५८५ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. तर यात १२५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत २ हजार ५८९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

----------------------------------------------------

वर्षे-अपघात-मृत्यू

२०१८-२४७-५१

२०१९-१७१-३४

२०२०-११२-२८

२०२१ मे पर्यंत -५५-१२

-------------------

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी

- सरकारने कोरोनाच्या महामारीत लागू केलेल्या लॉकडाऊन, संचारबंदी तसेच निर्बंधांमध्ये रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. दीड वर्षाच्या कोरोनाचा कालावधीत घडलेल्या अपघातांचा आढावा घेता २०१८ आणि २०१९ च्या तुलनेत अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.

- २०२० मध्ये ११२ अपघात, तर २८ जणांचा तर मे २०२१ पर्यंत ५५ अपघात झाले आहेत आणि यात १२ जणांनी जीव गमावला आहे. याप्रकरणी परिमंडळ ३ परिक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अपघातांच्या गुन्ह्यांची माहिती घेता २०२० मध्ये दाखल झालेल्या ११२ पैकी ७२ गुन्ह्यांचा, तर २०२१ मध्ये मेपर्यंत दाखल असलेल्या ५५ पैकी ४० गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे.

-----------------------------------------

पादचाऱ्यांनाही धोका

वाहनांचे अपघात होत असले तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अनोळखी वाहनाने धडक दिल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. पदपथ असतानाही रस्त्यावरून चालण्याची सवयही पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.

-----------------------

मृतांमध्ये सर्वाधिक तरुण

कर्णकर्कश हॉर्न, सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचा आवाज करत भरधाव दुचाकी चालविण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. दुचाकी व मोटार कार वेगात चालविताना मोबाइलवर बोलण्याची वृत्तीही तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येते. यामुळे देखील अपघात होऊन मृत्यू होत आहेत. यात तरुणांची सर्वाधिक संख्या दिसून येते.

-------------------------

या ठिकाणी वाहने चालवा हळू

कल्याण-आग्रा रोड, कल्याण-शीळ रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. तेथे छोटे-मोठे अपघात होण्याच्या घटना अधून-मधून घडत असतात. सध्या शीळ रोडचे विविध ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. यात पथदिवे नाहीत तसेच खड्डे ही पडले आहेत. तसेच डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा रोडवर शुक्रवारी झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर याआधीही अपघात घडून जीव गेले आहेत. त्यामुळे तेथे सुरू असलेली अपघातांची मालिका पाहता या रस्त्यांवर वाहने जपून चालवा.

--------------------------------------------

वेळ मौल्यवान; पण जीव अमूल्य

वाहन चालवताना सावधानता बाळगली पाहिजे. वाहनचालक बेदरकार वाहन चालविताना इतरांचेही आयुष्य धोक्यात घालतात. याचा अनुभव मी घेतला आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट घेतलेल्या चालकाने माझ्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. अपघातानंतर बरेच महिने माझी दिनचर्या बदलून गेली होती.

- पूजा किरावंत, महिला

-----------------

वाहनधारक वाहन चालविताना नियम सर्रासपणे धाब्यावर बसवतात. राँगसाइडने वाहने चालविणाऱ्या दुचाकीने माझ्या दुचाकीला धडक दिल्याने मी गाडीसह रस्त्यावर पडले. यात माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. बरेच दिवस चालताना त्रास होत होता. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्याची कृती सर्व वाहनधारकांकडून होणे अपेक्षित आहे

- वनजा कार्ले, तरुणी

-----------------

Web Title: Died cheap; Epidemic Coronane,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.