आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:04 AM2019-08-16T00:04:00+5:302019-08-16T00:05:43+5:30
कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे.
- निलेश धोपेश्वरकर
ठाणे : कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. यामुळे जेव्हा एखादा पुरुष अडचणीत येतो, तेव्हा तो मदत मागण्यासाठी कुणाकडेही जात नाही. जर त्याने मदतीसाठी हात पुढे केला, तर त्याला कमकुवत ठरवले जाते. अशातून त्याला नैराश्य येते आणि तो थेट आत्महत्या करतो. पुरुषांत असे नैराश्य येऊ नये, याकरिता ‘वास्तव’ फाउंडेशन या पुरुषांच्या हक्काकरिता लढणाऱ्या संघटनेच्या पुरुष कार्यकर्त्यांनी गुरुवारी बहिणींना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मी जरी पुरुष असलो तरी संकटकाळी मला मदतीची गरज असताना तू माझ्या मदतीला धावून ये, असे वचन या भावांनी आपल्या बहिणींकडून घेतले.
राखीपौर्णिमा हा बहीणभावाच्या पवित्र नात्यातील दिवस. बहीण आपल्या रक्षणासाठी भावाला राखी बांधते व संरक्षण करण्याचे वचन घेते. हीच आजवर चालत आलेली परंपरा आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून वास्तव फाउंडेशन आगळ्यावेगळ्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी करीत आहे. संकटाच्या काळात दुबळे ठरू नये, याकरिता कुणाचीही मदत न घेतल्याने अधिक अडचणीत येऊन पुरुषांनी आत्महत्या करू नये, याकरिता त्यांना मानसिक आधार व बळ मिळावे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.
याबाबत, ‘वास्तव’ फाउंडेशनचे संस्थापक अमित देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, साधारण दोन ते तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. बहीण मला आणि मी बहिणीला राखी बांधतो. भावाने बहिणीला राखी बांधण्याबाबत वास्तव फाउंडेशनने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी भावांनी आपल्या बहिणीला राखी बांधून ‘तू माझे संरक्षण करू शकते’, असे वचन तिच्याकडून घेतले. पुरुषांच्या हक्कासाठी लढणाºया देशभरातील ३० संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे सुरू असून तिथे गुरुवारी ४० पुरुषांनी पाच महिलांना राख्या बांधल्या. अधिवेशनात १५० पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
पुरूष एकटा नाही; हे सांगण्यासाठी केले राखीपौर्णिमेचे आयोजन
पुरुषांच्या आत्महत्येमागे त्यांचे रक्षण करणारा कुणीच नाही, हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व संकटांचा सामना एकाकी पुरुषानेच करायचा, ही विचारसरणी बदलण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी करायचे ठरवले. पुरुष अडचणीत सापडला तर बहिणीकडे जा, ती नक्कीच मदत करेल, तू स्वत:ला कमकुवत समजू नको, असा संदेश देणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे ते म्हणाले. यातून महिला सक्षम आहेत, हेही सांगितले जाते. पुरुषाला त्रास होतो, तेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ नसते. म्हणूनच, या राखीपौर्णिमेतून पुरुषालाही त्रास होतो, हे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
हे तुझे आहे कर्तव्य : मुळात राखीपौर्णिमा उत्तर भारतातील सण आहे. आता महाराष्ट्रातही तो साजरा होऊ लागला आहे. पुरुष असल्याने तू संरक्षण करणे, हे तुझे कर्तव्य आहे, हेच अधोरेखित झाले आहे. पौराणिक काळात ब्राह्मण हे क्षत्रियांना राखी बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे वचन घेत असल्याचे दाखले आहेत, याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले.