संस्कृत एकांकिकांसाठी कलाकारांची मोठी वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:18 AM2019-12-13T01:18:51+5:302019-12-13T01:19:48+5:30
कठीण भाषा, पाठांतरामुळे तरुणांची भाषा शिकण्याकडे पाठ
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : राज्य हौशी नाट्य स्पर्धेत संस्कृत नाटकेही सादर केली जातात. १९९२ मध्ये केलेल्या नियमानुसार केवळ संस्कृत नाटकांमध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांना सहभागी होता येते. यंदाही मुंबईतून पाच तर, ठाणे जिल्ह्यातून एक एकांकिका स्पर्धेत दाखल झाल्या. मात्र, असे असले तरी संस्कृत नाटकांसाठी फारसे कलाकार मिळत नाहीत. कारण ही भाषा कठीण आहे. तसेच पाठांतर आवश्यक असल्याने या भाषेच्या उच्च शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विशेषत: तरुण वर्ग वळत नाहीत. त्यामुळे ही भाषा बोलणारे कलाकारही कमी आहेत.
राज्य हौशी नाट्य स्पर्धा मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत आणि दिव्यांग अशा पाच विभागांत होते. परंतु, संस्कृत भाषेतील नाटक कोणी फारसे करत नाही. संस्कृतमध्ये एकांकिका असते. राज्य नाट्य स्पर्धेत मराठी व हिंदी नाटके दोन अंकी तर, संगीत नाटके दोन-तीन अंकी असतात. संस्कृतमध्ये एकांकिका करणेही कठीण आहे. त्यामुळे दोन अंकी नाटकांचा विचारही कोणीही करू शकत नाही. परंतु, संस्कृत नाटकात शाळा व संस्कृत पाठशाला सहभागी होऊ शकतात, असा नियम असून, कोणत्याही वयाचा विद्यार्थी त्यात सहभाग घेऊ शकतो.
पूर्वीच्या पाठशालाच्या धर्तीवर ती संकल्पना असल्याने विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येते. या स्पर्धेत सर्व वयोगटांना सहभागी होता येते.
संस्कृत व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नाटकांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी होता येत नाही. लोप पावणाऱ्या संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे हा प्रयत्न केला जात आहे. परंतु, निकालासाठीची काठिण्यापातळी ही सर्व नाटकांना सारखीच आहे, असे संस्कृत नाट्य दिग्दर्शक दिगंबर आचार्य यांनी सांगितले.
ज्या शाळा, महाविद्यालयांत संस्कृत विभाग आहे त्यांना प्राधन्य दिले गेले कारण कोणीही संस्कृत नाटक करू शकत नाही. संस्कृतमध्ये एकांकिका तर मराठीमध्ये दोन अंकी नाटिका असते, हा खूप महत्त्वाचा फरक दोन्हींमध्ये आहे. मात्र, इतर सर्व नाटकांना स्पर्धेची नियमावली सारखीच आहे. संस्कृत नाटकासाठी फारसे कलाकार नाहीत. तसेच ही भाषा अनेकांना बोलताही येत नाही. त्यामुळे ही भाषा बोलणारे कलाकारही कमी आहेत. संस्कृतमध्ये अभ्यास करणे वेगळे पण त्यात कलाकार विशेषत: पुरुष कलाकार मिळणे कठीण आहे. कारण संस्कृत महाविद्यालयांत ९० टक्के मुली आहे. त्यामुळे त्यांनाच नाटक करावे लागते किंवा मुलांची भूमिका वटवावी लागते.
राज्य नाट्य स्पर्धेत संस्कृतमध्ये विर्सग विसरला तरी गुण कमी होतात आणि स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर जातात. मराठी एकांकिका चार दिवसांत बसवून होते, त्याउलट संस्कृतला एक महिन्याचा सराव करावा लागतो. त्यामुळे संस्कृत नाटकात काम करण्यासाठी विद्यार्थी पुढे येत नाहीत. मराठी नाटकात काम केल्यावर त्या विद्यार्थ्यांला किंवा कलाकाराला व्यासपीठ मिळते. संस्कृत नाटकात ते होत नाही. तसेच पारितोषिक मिळाले तरी त्याची दखल कुणी घेत नाही. विशेष म्हणजे संस्कृत भाषेत स्पर्धा होते हेच अनेकांना माहीत नसल्याने प्रसिद्धी मिळत नाही.
थेट अंतिम फेरी
राज्य नाटक स्पर्धेत संस्कृत भाषिक नाटकांची प्राथमिक फेरी न होता थेट अंतिम फेरी होते. कारण २८ नाटिका संस्कृतसाठी येतात. त्या तुलनेत मराठीत नाटकांची संख्या अधिक असल्याने ३० मधून दोन नाटकांची निवड केली जाते. संस्कृत नाटकात निवडीची संधी मिळत नाही.
‘ती’ अट शिथील
नाटकाच्या प्रतीत कु णी पुरुष पात्र स्त्रीची किंवा स्त्री पुरुष पात्रांची भूमिका बजावणार असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख असावा लागतो. ही अट संस्कृत नाट्य स्पर्धेसाठी आणि तोही फक्त शालेय संस्थांसाठी शिथील करण्यात आली आहे.