ठाण्यात विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:43 PM2018-09-18T15:43:56+5:302018-09-18T15:46:27+5:30
पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना ठाण्यात विविध ठिकाणी आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. तर अनेक ठिकाणी डिजे दणदणाट झाल्याचे दिसले आहे.
ठाणे - गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यास बंदी घातली आहे. असे असले तरी ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना डिजेचा दणदणाट झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ध्वनीची मर्यादा डेसीबल पेक्षाही अधिक पटीने असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि डिजेचा दणदणाट झाला होता. त्यामुळे हाच दणदणाट आता १० दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीतही वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजवू नये असे स्पष्ट केले आहे. या संदर्भातील पुढील निकाल १९ सप्टेंबर रोजी लागणार आहे. असे असतांना सुध्दा ठाण्यात डिजेचा दणदणाट होणार हे मनसे आणि राष्ट्रवादीने स्पष्ट केले होते. त्यानुसार पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे सोबत ढोलताशा, अम्प्लेफायरस आदींच्या वाद्यांचा दणदणाट दिसून आल्याचे बेडेकर यांनी सांगितले. यावेळी बेडेकर यांनी शहरातील १० ठिकाणच्या ध्वनीची पातळी तपासली असता, राम मारुती रोड येथे रात्री ८.२० च्या सुमारास ९० ते ९५ डेसीबल, गोखले रोड ९५ ते १०० डेसीबल, मल्हार सिनेमा ९०, बाफना सर्जिकल सर्व्हीस रोड ८५ ते ९०, वर्तक नगर ९० ते ९५, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी ८५ ते ९० शास्त्री नगर ९५ ते १००, टीएमसी निपुण हॉस्पीटल ८५ ते ९०, पाचपाखांडी ९५ आणि देवधर हॉस्पीटल गोखले रोड येथेही आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.