दिघे यांच्या आठवणीत रंगला 'धर्मवीर'च्या ट्रेलर लाँचचा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 05:56 AM2022-05-08T05:56:48+5:302022-05-08T05:57:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आनंद दिघे आणि माझ्यात काही साम्ये आहेत असे मला आज या कार्यक्रमात सगळे सांगत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आनंद दिघे आणि माझ्यात काही साम्ये आहेत असे मला आज या कार्यक्रमात सगळे सांगत आहेत. मला त्यांच्यावर केलेल्या चित्रपटाचा हा ट्रेलर भरपूर आवडला...अशा शब्दात अभिनेता सलमान खान त्याच्या खास अंदाजात 'धर्मवीर'च्या ट्रेलर लॉंचचा सोहळ्यात व्यक्त झाला. त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमान रील लाईफमधील दबंग आहे, तर दिघे रिअल लाईफमधील दबंग होते, अशी त्यांच्या शैलीत दाद दिली.
शिवसैनिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आनंद दिघे यांच्यावरील १३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'धर्मवीर'च्या ट्रेलर लॉंचचा सोहळा ताज लँड्स एन्ड येथे झाला. त्यास रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, अरुणाताई दिघे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, बच्चू कडू, मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, अभिनेता रितेश देशमुख, शर्मन जोशी, अमिषा पटेल, गुलशन ग्रोव्हर, प्रीती झंगियानी, दिव्या दत्ता, सुशांत शेलार, कश्मिरा शाह, मंगेश देसाई, प्रवीण तरडे, श्रुती मराठे यांच्यासह विविध मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
आनंद दिघे यांच्यासारखा कट्टर कार्यकर्ता पुन्हा होणार नाही असे म्हणत बाळासाहेबांच्या शैलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शाब्बास नाव राखलंत, निष्ठा राखलीत... गुरू-शिष्याचं नातं जपणारा शिवसेना हा जगातील एकमेव पक्ष आहे. अनेकांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संपवून शिवसेना पुढे गेल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांप्रमाणे ठाण्यात कडवे शिवसैनिक घडवून शिवसेना मजबूत करणाऱ्या आनंद दिघे यांना जनतेने धर्मवीर ही पदवी दिली. ५० वर्षांच्या जीवनात दिघे १०० वर्षे जगले. त्यांनी शिवसेनाप्रमुखांकडे काहीही मागितले नाही. फक्त निष्ठा कायम ठेवली, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले. एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सिनेमा काढून मोठे काम केल्याचे कौतुकही ठाकरे यांनी केले.
प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर निर्मिती मंगेश देसाई आणि झी स्टुडिओज यांनी केली असून, लेखन-दिग्दर्शन प्रवीण तरडेने केले आहे.
जीवन जगण्याची प्रेरणा - शिंदे
दिघेसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर बनविल्याचे एकनाथ शिंदे या सोहळ्यात म्हणाले. दिघे यांच्या समांतर न्याय व्यवस्थेने अनेकांना केवळ न्यायचं नव्हे, तर जीवन जगण्याची प्रेरणा दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.