झाडांवर डिजिटल वॉच
By admin | Published: January 6, 2017 06:16 AM2017-01-06T06:16:14+5:302017-01-06T06:16:14+5:30
मागील वेळेची वृक्षगणना वादग्रस्त ठरल्यानंतर महापालिकेने आता पुन्हा वृक्षगणनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तो सुरू होणार आहे
ठाणे : मागील वेळेची वृक्षगणना वादग्रस्त ठरल्यानंतर महापालिकेने आता पुन्हा वृक्षगणनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तो सुरू होणार आहे. चार वर्षांपूर्वी जीआयएस आणि जीपीएस प्रणाली वापरणारी ठाणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली होती. या वेळीदेखील हेच तंत्रज्ञान वापरून वृक्षगणना केली जाणार आहे. मागील वेळेच्या वृक्षगणनेत वापरलेल्या तंत्रज्ञानापेक्षा या वेळचे तंत्रज्ञान अधिक प्रगत असून त्यात महापालिका हद्दीतील सर्वच वृक्षांवर डिजिटल वॉच राहणार असल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे.
महापालिका हद्दीत नेमके किती वृक्ष आहेत, कोणत्या जातीचे आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी दर पाच वर्षांनी वृक्षगणना केली जाते. यापूर्वी २०१२ मध्ये अशा प्रकारचा सर्व्हे झाला होता. त्या वेळेस जीआयएस आणि जीपीएस प्रणालीचा वापर केला होता. परंतु, ही प्रक्रिया अत्यंत खर्चीक असल्याचे सांगून तीवर आक्षेपही घेण्यात आला होता. असे असतानादेखील पालिकेने याच पद्धतीचा अवलंब करून वृक्षगणना पूर्ण केली होती. त्यानंतर, अशा प्रकारची यंत्रणा वापरणारी महापालिका देशातील पहिली महापालिका ठरल्याचा बहुमानही मिळाला होता.
दरम्यान, आता पालिकेने याच पद्धतीने वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या वेळेचे तंत्रज्ञान हे अधिक प्रगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, वृक्षगणनेसाठी निविदादेखील मागवल्या असून त्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेची निवडणूक झाल्यावर किंवा आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर वृक्षगणनेच्या कामाला सुरु वात होण्याची शक्यता आहे. नव्या तंत्रज्ञानात वृक्षांची सर्व माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदवल्यानंतर ती थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) दिसणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक झाडाचे संपूर्ण विश्लेषण प्रत्येक नागरिकाला महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. भविष्यात नकाशामधील एखादे झाड प्रत्यक्षात दिसत नसेल, गायब असेल, तर नागरिक थेट ठाणे महापालिकेमध्ये आॅनलाइन तक्र ार करता येणार आहे. विकासकाने अमुक एक वृक्ष अथवा अनेक वृक्ष कापल्याची तक्रार नेहमी महापालिकेकडे येत असते. विकासकाकडून नेहमीच ही गोष्ट अमान्य केली जाते. मात्र, या सर्व्हेनंतर आता डिजिटल नकाशा पाहून बेकायदेशीररीत्या झालेली वृक्षतोड सिद्ध करता येणार आहे.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी वृक्षगणनेच्या कामाला ७५ लाखांचा निधी खर्च केला होता. या वेळी तो १० लाखांनी वाढला आहे. शहरात नेमकी किती वृक्षसंख्या आहे आणि किमान हरितक्षेत्र राखण्याकरिता किती प्रमाणात वृक्षांची आवश्यकता आहे, हे पाहणे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. (प्रतिनिधी)