राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:47 PM2021-06-26T21:47:00+5:302021-06-26T21:47:36+5:30

Thane News : डिजीठाणेने राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.

Digithane project ranked second in the national level India Smart City Awards | राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक 

राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक 

googlenewsNext

ठाणे - भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा २०२०" मध्ये ठाणे महापालिकेच्या 'डिजी ठाणे' या डिजिटल प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोरोना काळात प्रकल्पांची अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या संदर्भातील कामगिरीचे धोरण, प्रकल्प आणि संकल्पना या मापदंडांवर मूल्यमापन करण्यात आले असून यामध्ये अग्रणी ठरणाऱ्या शहरांना आयएससीएच्यावतीने सन्मानित करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी दोन टप्प्यांमध्ये अनेक कसोट्यांवर मूल्यमापन करण्यात आले. एकूण १०० सहभागी प्रकल्पांपैकी केवळ ५० स्मार्ट सिटी प्रकल्पांची कोविड-१९ साथीच्या कालखंडात अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे प्रकल्पाला ‘प्रशासन’ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.

डिजीठाणेने राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. त्याचबरोबर, डिजीठाणे प्रकल्पाने कोरोना साथीच्या कालखंडात ब महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे, थमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनविण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी २५,००० नागरिकांनी या ऑनलाईन स्व-चाचणी टूलचे  वापर करून महानगरपालिकेला सक्रिय पद्धतीने  कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत केली आहे. 
 

डिजीठाणेच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात अद्ययावत आकडेवारी देणारा डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामध्ये पॉजिटीव्ह रुग्ण, रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या, मृत्यूदर, एम्ब्युलन्स सेवा इत्यादींच्या अद्ययावत माहितीमुळे कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सहाय्य झाले आहे. या डॅशबोर्ड ला ४५,००,००० नागरिकांनी भेट दिली आहे.  नागरिकांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे तपासणीची मोफत सुविधा डीजी ठाणेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
        
तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून डिजीठाणे कोव्हिड-१९ डॅशबोर्डच्या संकेतस्थळावर विसर्जनाची टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करण्यासाठी २५,००० पेक्षा जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात लागू असलेल्या संचारबंदी चे पालन करताना अत्यावश्यक प्रवासासाठी डीजीठाणे प्रणालीद्वारे जवळपास १०,००० नागरिकांनी आपले योग्य कारण नोंदवून ई-पास साठी अर्ज दिले होते. तसेच झोमाटो व वेलनेस फॉरएवर बरोबर भागीदारी करून डीजीठाणे द्वारे १५,००० सुरक्षित रित्या औषधे व अत्यावश्यक वस्तूंचे घरपोच सेवा देण्यात आली होती.  

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने यशस्वीरीत्या राबविण्यात येणारा डिजीठाणे हा डिजीसिटी प्लॅटफॉर्म सर्वाधिक संवादी(interactive) पद्धतीने कार्यरत असणारे वेब पोर्टल आणि मोबाईल एप्लिकेशन ठरले आहे. ठाणे स्मार्ट सिटीज लिमिटेडने उत्कृष्ट कामगिरी केली असून सरकार, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य ही उद्दिष्टे साध्य केली आहेत. नागरिकांद्वारे सरकार ते नागरिक, व्यवसाय ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक सेवा देण्यात डिजी ठाणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या नव्या वेगवेगळ्या योजनांबरोबरच  ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडीचीही माहिती तात्काळ उपलब्ध् करुन दिली जात आहे. आरोग्याबद्दल सजग असलेल्या ठाणेकरांना आरोग्य उत्तम राखण्यातही डिजीठाणेचे सहाय्य होत असून शैक्षणिक माहितीही याद्वारे उपलब्ध होत आहे.
         
प्रदूषण नियंत्रण, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वीज बचत, आरोग्य आदी महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये नागरिक तसेच युवक यांचा सहभाग वाढविण्यासाठी डीजी ठाणेच्या माध्यमातून काही प्रोत्साहनपर योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे नागरिक आणि शासन यांमध्ये संवादमाध्यम उपलब्ध झाले आहे तसेच स्थानिक व्यावसायिकांनादेखील एक व्यासपीठ मिळाले आहे. या सर्व उपक्रमाला  ठाणेकरांनी  उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच डिजी ठाणेचा सन्मान हा राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला आहे.

Web Title: Digithane project ranked second in the national level India Smart City Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.