आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा सावंत हिने पटकावला प्रथम क्रमांक

By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 4, 2024 04:06 PM2024-02-04T16:06:48+5:302024-02-04T16:07:17+5:30

सतीश प्रधान महाविद्यालयाच्या ज्येष्ठ विभागाच्यावतीने ए. व्ही. सभागृहात पार पडली. यंदा या स्पर्धेचे १९ वे वर्ष होते.

Diksha Sawant won the first rank in the inter-college elocution competition | आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा सावंत हिने पटकावला प्रथम क्रमांक

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा सावंत हिने पटकावला प्रथम क्रमांक

ठाणे : कै. ग. का. फणसे स्मृतिचषक कोकण विभागीय आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे परितोषिक रामनारायण रूईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिक्षा सावंत हिने पटकावले तर द्वितीय क्रमांक वर्षाली ठाकूर (एम. डी. महाविद्यालय), तृतीय क्रमांक कौस्तुभ गोसावी (वझे केळकर महाविद्यालय) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक, पूनम हेंडगे (शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी) यांना प्राप्त झाले. तसेच, उत्स्फूर्त फेरीतील कौस्तुभ गोसावी (वझे केळकर महाविद्यालय) हा विद्यार्थी या फेरीत अव्वल ठरला. सर्व स्पर्धकांनी निवडलेल्या विषयांवर उत्तम वैचारिक मांडणी केली. विषयाबाबतची त्यांची खोलवरची समज आणि उत्तम सादरीकरणाने त्यांनी सभागृहातील सर्वांना बांधून ठेवले. 

सतीश प्रधान महाविद्यालयाच्या ज्येष्ठ विभागाच्यावतीने ए. व्ही. सभागृहात पार पडली. यंदा या स्पर्धेचे १९ वे वर्ष होते. यंदाच्या स्पर्धेचे परीक्षक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि 'कायद्याने वागा' या चळवळीचे प्रणेते आणि माजी नगरसेवक राज असरोंडकर यांनी केले. परीक्षकांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आणखी दहा वर्षांनी या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला. स्पर्धेची सुरुवात अण्णा फणसे यांच्या प्रतिमेला सपुष्प अभिवादन करुन झाली. यावेळी महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान तसेच प्राचार्य डॉ. गणेश भगुरे आणि फणसे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समितीच्या समन्वयक आणि मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले. प्राचार्य डॉ. भगुरे यांनी स्पर्धेत भाग घेणे आणि सर्वांपुढे येऊन धिटाईने आपले विचार मांडणे, ही महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव प्रधान यांनी विद्यार्थी हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांचे विचार या स्पर्धेच्या निमित्ताने अभिव्यक्त व्हायला मदत होते, असे त्यांनी सांगितले. फिरता चषक आणि रोख रक्कमेची पारितोषिके तसेच प्रमाणप्रत्रके देऊन परीक्षकांच्या आणि फणसे कुटुंबातील अंजली फणसे - गुप्ते यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी पाथरकर यांनी तर परीक्षकांचा परिचय प्रा. शीतल गाणार यांनी करुन दिला. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्र-संचालन प्रा. शीतल गाणार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Diksha Sawant won the first rank in the inter-college elocution competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे