भिवंडीतील माणकोली अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन
By नितीन पंडित | Published: March 29, 2023 05:57 PM2023-03-29T17:57:21+5:302023-03-29T18:04:08+5:30
एक तास वाहतूक विस्कळीत
नितीन पंडित
भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुर फाटा ते चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाचे व टोल कंपनीचे दुर्लक्ष झाले असल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या या जीवघेण्या रस्त्याकडे शासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष जावे यासाठी बुधवारी नागरिकांनी एकत्र येत खारबाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थ गाव विकास समितीच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.गाव विकास समितीचे प्रमुख ज्ञानेश्वर ओम मुकादम,अशोक पालकर,दिनेश म्हात्रे,रामनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली खारबाव येथे हे रास्तारोको आंदोलन करीत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.
माणकोली अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्यावर मालोडी येथे टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोलवसुली होत असते.मात्र या रस्त्याची मागील चार ते पाच वर्षांपासून दुरावस्था झाली आहे.रस्त्या तील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असे असून ही सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीवर कोणती ही कारवाई करीत नसल्याने व केली जाणारी दुरुस्ती ही तकलादू असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने करीत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असल्याची प्रतिक्रिया आंदोलनाचे संयोजक ज्ञानेश्वर ओम मुकादम यांनी दिली आहे.
सकाळी सुरु केलेले हे आंदोलन सुमारे एक तास सुरू राहिल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या आंदोलनात प्रशांत म्हात्रे,नितीन पाटील,मनोज म्हात्रे,देवानंद म्हात्रे,प्रवेश देवळीकर,हेमलता पालकर,कल्पना पाटील,वैशाली पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शाखा अभियंता परदेशी यांनी निवेदन स्वीकारून येत्या १५ मे पर्यंत रस्ते दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले .दरम्यान रास्तारोको आंदोलन काळात खारबाव कामण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती .तालुका पोलिसांनी त्यानंतर आंदोलकांना त्या ठिकाणाहून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.