खोदलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम; ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:01 AM2020-09-07T00:01:20+5:302020-09-07T00:01:27+5:30
विकासकामे मार्गी लागूनही रस्ते दुर्लक्षित
डोंबिवली : आधीच पावसाळ्यात खड्ड्यांनी वाहनचालक बेजार झाले असताना दुसरीकडे विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतरही सुस्थितीत करण्यात आलेले नाहीत. हे चित्र ठाकुर्ली परिसरातील ९० फुटी रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे. खंबाळपाड्याच्या दिशेने जाणारा ९० फुटी रोड हा कित्येक महिने वाहतुकीसाठी बंद आहे. यात विरुद्ध दिशेने वाहतूक चालविली जात असल्याने अपघातांची शक्यता असतानाच म्हसोबा चौकाकडे येणारा रस्ताही आता खड्ड्यांत गेल्याने वाहनचालकांसाठी वाट खडतर अशीच ठरली आहे.
समांतर रस्त्यावर मलवाहिनीसाठी खोदकाम केले होते. ते काम उशिरा का होईना मार्गी लागले. खोदलेल्या भागात काही महिन्यांपूर्वी केवळ खडीकरण केले. मात्र, त्यावर अद्याप डांबर टाकलेले नाही. त्यात ९० फुटी रोडवरील म्हसोबा चौक ते खंबाळपाडा रोडकडे जाणारा रस्ताही अनेक दिवसांपासून खोदला होता. ९० फुटी रोडवर संथगतीने सुरू असलेले हे काम पूर्ण व्हायलाही बराच कालावधी लागला. परंतु, ज्याठिकाणी काम झाले, त्याठिकाणच्या काही भागांतच खडीकरण केले आहे. मात्र, काही ठिकाणी खोदलेला रस्ता केवळ मातीचा भराव टाकून बुजवला आहे.
कित्येक महिने ही परिस्थिती कायम राहिल्याने आता त्याठिकाणी झाड आणि रान उगवले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. खंबाळपाड्याहून म्हसोबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बºयाच कालावधीनंतर खड्ड्यांच्या ठिकाणी डांबराचे पॅच मारले. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु, पॅचमुळे हा रस्ता समपातळीत राहिलेला नव्हता. परंतु, आता पुन्हा पावसात याठिकाणी खड्डे पडले आहेत. गणोशोत्सव काळात माती आणि खडीचा भराव टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुुजविण्याचा प्रयत्न झाला खरा, मात्र तो फोल ठरला. एकीकडे खंबाळपाड्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी गैरसोयीचा ठरला असताना आता म्हसोबा चौकाकडे येणारा मार्गही खड्ड्यांत गेल्याने कसरत करावी लागत आहे.
मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात
डोंबिवली शहरात बहुतांश रस्ते सद्य:स्थितीला खड्ड्यांत गेले आहेत. त्यामुळे सातत्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून वाहनचालकांसाठी खड्डे त्रासदायक ठरत आहे. थुंकपट्टी न लावता चार दिवसांत दुरुस्त नाही केले, तर मनसेच्या आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमसीला दिला आहे.